तान्हियाचे दांत जशी मोतियांची ओळी
हांसता पडे खळी गोड गाली ८१
तान्हियाचे दांत जसे डाळिंबाचे दाणे
हांसविते कौतुकाने उषाताई ८२
पेरा झाला रानांतून मोड काढ वरी मान
तसे हंसे माझे तान्हे पाळण्यांत ८३
गोर्या गालांवर मुलामा लाल लाल
जणू गुलाबाचे फूल शोभिवंत ८४
रुप्याच्या वाटींत ठेवावे लाल फूल
तसे राजसाचे गाल तान्हेयाचे ८५
गोर्या गालांवर लाल शोभतो मुलामा
गोड हसशी गुलामा तान्हेबाळा ८६
तान्हीया रे बाळा गोड तुझी हनुवटी
गोंडस तुझ्या मुठी नाचवीशी ८७
कुरळया केसांचा विरळ दातांचा
लाडका आईचा तान्हेबाळ ८८
चंद्राची वाढे कला तसें बाळाचे बाळसें
लावण्या उणें नसे अणुमात्र ८९
कितीदा हाका मारू लेकाच्या जिन्नसा
मोत्याच्या कणीसा तान्हेबाळा ९०
माझे दोघे बाळ दारावरी उभे
चंद्रसूर्य दोघे उगवले ९१
माझे दोघे बाळ उभे पारापरी
शेजीच्या दारावरी उजेड पडे ९२
माझा बाळ गोरा हळदीचा ओंडा
शोभते गोरे तोंडा पिंपळपान ९३
माझे तान्हेबाळ हळदीचा ओंडा
पाठीवरती गोंडा रेशिमाचा ९४
माझे तान्हेबाळ हळदीने न्हाई
त्याचे पाणी जाई शेवंतीला ९६
शेवंती फुलली फुलली सोन्यावाणी
न्हाणाचे जाते पाणी तान्हेबाळाचे ९७
निळे ग गगन हिरवें ग रान
आहे गोरे पान तान्हेबाळ ९८
काळी ग यमुना सांवळा ग कान्हा
गोरा गोरा माझा तान्हा गोपूबाळ ९९
काळा ग कालीया काळा ग घननीळ
सुंदर तान्हेबाळ माऊलीचे १००