मैत्रीणीकडे गेल्यें मैत्रीणीला गर्व भारी
पायांनी पाट सारी बसावया ४६१
मैत्रीणीकडे गेल्यें मैत्रीणीच्या दारा कडी
तिच्या मनामध्ये अढी राहिलीसे ४६२
प्रेमाच्या नात्याशी राहील कशी अढी
चंद्राशी नाही कधीं अंध:कार ४६३
जीवाला माझ्या जड सांगू मी कोणापाशीं
सखी राही दूर देशीं शांताबाई ४६४
जीवाला माझ्या जड नका सांगूं एकाएकी
घाबरी होईल सखी शांताताई ४६५
जीवाला माझ्या जड नका सांगू मैत्रीणीस
पडेल धरणीस शांताताई ४६६
जीवाला माझ्या जड नका सांगूं वाटे
सखी गहिवरें दाटे शांताताई ४६७
जीवाची मैत्रीण पडली दूर स्थळी
दृष्टीला नाही पडली बारा वरसं ४६८
माझ्या ग मैत्रीणी आहेत देशोदेशी
आषाढी एकादशी भेटी झाल्या ४६९
आपण मैत्रीणी जाऊं ग बारा वाटे
जसे नशिबाचे फांटे फुटतील ४७०
आपण मैत्रीणी पुन्हा भेटू कधी
आठवू मनामधी एकीमेकी ४७१
वारियांच्या संगे आपण पाठवू निरोप
पोंचेल आपोआप मैत्रीणीला ४७२
आपण मैत्रीणी मनांत आठवू
पत्रें तीं पाठवू वार्यावरी ४७३
जिवाची मैत्रीण देवा खुशाल ठेवावी
सुखांत नांदावी सासुर्याला ४७४
माझ्या आयुष्याची दोरी आहे बळकट
सखी मला कधी भेंट देईल हो ४७५
माझ्या ग मैत्रीणी आहेत दहाबारा
एक दिली सुभेदारा शांताबाई ४७६
माझ्या ग मैत्रिणी आहेत दोघीतीघी
त्यात माझ्या मनाजोगी मनुबाई ४७७
माझ्या ग मैत्रीणी आहेत वीसतीस
एकीला द्यावा खीस खोबर्याचा ४७८
माझ्या ग मैत्रीणी आहेत गोर्यागोर्या
कपाळी लाल चिर्या कुंकवाच्या ४७९
माझ्या ग मैत्रीणी आहेत शंभर
त्यांत पहिला नंबर कमळाताईचा ४८०