पहिल्याने गर्भार आली माहेराला
आनंद मनी झाला मायबापां १२१
पहिल्याने गर्भार औषधें ठेवी घरी
बाळी आहे सुकुमारी उषाताई १२२
हिरव्या खणासाठी रुपया सारीला
चोळी गर्भार नारीला उषाताईला १२३
पहिल्याने गर्भार कंथ पुशीतो आडभिंती
तुला महिने झाले किती उषाताई १२४
पहिल्याने गर्भार कंथ पुशीतो गोठ्यांत
हिरवें डाळिंब ओटींत उषाताईच्या १२५
गरभार नारी गर्भच्छाया तोंडावरी
हिरवी चोळी दंडावरी उषाताईच्या १२६
गरभार नारी उकाडा होतो भारी
झोंपाळा बांधी दारी अप्पाराया १२७
पहिल्याने गर्भार डोहाळे धाड मला
माझ्या बागेचे पेरू तुला उषाताई १२८
तीनशें साठ पाट काढीले कारणाला
तुझ्या डोहाळ-जेवणाला उषाताई १२९
डोहाळे तुला होती सांगून धाड मला
बागेची लिंबें पाठवीन १३०
आंबे आले पाडा चिंचबाई कधी येशी
डोहाळे पुरवीशी उषाताईचे १३१
आंबे आले पाडा पहिल्या पिकाचे
डोहाळे लेकाचे उषाताईला १३२
बांगडया भर रे कासारा हिरवा कारला
तुला नववा ग लागला उषाताई १३३
बांगडया भर रे कासारा बांगडी हिरवी दुधार
पहिल्याने गर्भार उषाताई १३४
सोनसळे गहूं ठेवीले कारणाला
डोहाळ-जेवणाला उषाताईच्या १३५
हिरव्या खणाची मला गरज लागली
गर्भिणी ऐकिली उषाताई १३६
रुपया मोडला हिरव्या खणाला
तुझ्या डोहाळ-जेवणाला उषाताई १३७
आणावी घोंगडी आणावें कांबळ
येईल माझा बाळ बाळंतपणा १३८
बाज करा नीट करा साफसूफ खोली
येईल माझी बाळी बाळंतपणा १३९
पहिल्याने गर्भार नको भिऊं तूं जिवाला
तुझी काळजी देवाला उषाताई १४०