शाळेसी जातांना डोळे येती कां भरून
केव्हा तुला मी भेटेन माऊलीये ३४१
शाळेच्या पंतोजींना देऊं करा ताटवाटी
नका मारूं छडीकाठी तान्हेबाळा ३४२
शाळेच्या पंतोजींना देऊं करावी सुपारी
नका मारूं हो दुपारी तान्हेबाळा ३४३
शाळेच्या पंतोजींना देऊं करावी खारीक
बाळ शिकूं दे लिहाया आता अक्षर बारीक ३४४
शाळेच्या पंतोजींना देऊ करावा धोतरजोडा
सांगा, नका देऊं खडा मानेवरी ३४५
शाळेच्या पंतोजींना देऊं करावी घागर
मारूं नका सुकुमार तान्हेंबाळ ३४६
शाळेचा पंतोजी उग्र हो मुद्रेचा
जीव घाबरे मुलांचा क्षणोक्षणी ३४७
शाळेचा पंतोजी त्याचा केवढा दरारा
मुलें कांपती थरारा थंडीवीण ३४८
शाळेचा पंतोजी मुद्रा त्याची उग्र
मुलांना वाटे व्याघ्र खरोखरी ३४९
शाळेचा पंतोजी शिकवीतो पाढे
मुलांना येई रडे ओक्साबोक्शी ३५०
शाळेचा पंतोजी शिकवी एक दोन
मुलें जाती कंटाळून ओरडून ३५१
शाळेचा पंतोजी पढवी बेकंबेला
मुलांचा जीव गेला म्हणता म्हणता ३५२
शाळेचा पंतोजी शिकवितो लेंखे
सुकतात मुखे बाळ राजांची ३५३
शाळेचा पंतोजी शिकवी अकरकी
मुलांची मुखश्री कोमेजली ३५४
शाळेचा पंतोजी मुला पर्वचा शिकवी
सारखा चाखवी महिमा छडीचा ३५५
शाळेचा पंतोजी वाजवीतो छडी
येती रडकुंडी तान्ही बाळें ३५६
शाळेचा पंतोजी छडी वाजवितो
मुले रडवीतो घडोघडी ३५७
शाळेचा पंतोजी रडवीतो मुलें
कोमेजती फुलें देवाघरची ३५८
शाळेचा पंतोजी छडी का शीणवील
कळया का फुलवील पाण्यावीण ३५९
शाळेचा पंतोजी काय शिकवीतो
सोडीतो बांधीतो रुमालाला ३६०