दांडपट्टा खेळे        करी तलवारीचे हात
घोडा नेत दौडवीत        भाईराया ॥

आपल्या बहिणीची अब्रू सांभाळावयासही तो समर्थ आहे. अब्रू सांभाळण्याची गोष्ट निघाली की, काहींच्या डोळयासमोर एकदम मुसलमान येतील. परंतु आपल्या बहिणींनी मुसलमान भाऊ मानले होते. मुसलमान तेवढे वाईट असे त्यांचे मत नव्हते. वाईट लोक सर्वत्र आहेत :

मानीयला भाऊ                जातीचा मुसलमान
दिवाळीचा चोळी                      त्याचा कागदी सलाम ॥
मानीयला भाऊ               जातीचा मुसलमान
दिवाळीची चोळी                     घरीं आलासे घेऊन ॥
मानीयला भाऊ               जातीचा मुसलमान
सख्ख्या भावाच्या परीस            त्याचें आहे ग इमान ॥
दरसाल येतो                   बहिणीला आठवून
जातीचा मुसलमान                  प्रेमासाठी ॥

बहिणीच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी तो मुसलमान आतुर असतो. अधीर असतो. तो या मानलेल्या बहिणीकडे येतो. परंतु इतर लोक हसतात ते पाहून त्या मानलेल्या बहिणीला वाईट वाटते. ती म्हणते,

मानीयला भाऊ            जातीचा मुसलमान
नको ग त्याला हंसू            दु:खें जाईल त्याचा प्राण ॥

तो मानलेला मुसलमान भाऊ आपल्या मानलेल्या बहिणीकडे येतो. लोकांना तो पाहवत नाही. टवाळपणे प्रश्न करतात :

मानीयला भाऊ        काय तुला तो ग देतो
दिवाळीची चोळी            घेऊनिया घरां येतो ॥

परंतु शेवटी ती मानलेली बहीण आपल्या मानलेल्या भावास दु:खाने म्हणते :

“तुझा माझा भाऊपणा        जगजाहीर नसावा
लोभ अंतरी असावा                    भाईराया ॥
आपण गूज बोलूं                डाळिंबीसमान
तूं भाऊ मी बहीण                      जडे नातें ॥”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel