पंढरपुरातील सर्वच वस्तू पवित्र, अणुरेणू पवित्र. बायका म्हणतात, “पंढरपुरातील वस्तूंची रूपे आम्हांला धारण करू देत.
पंढरपुरींची होईन वेळणी
वाढीन साखरफेणी विठ्ठलाला
पंढरपुरीची होईन परात
वाढीन साखरभात विठ्ठलाला
मला परात होऊ दे, वेळणी होऊ दे, गडू होऊ दे, मला पक्षी होऊन शिखरावर बसू दे, पायरी होऊन संतांच्या पायांच्या धुळीने पवित्र होऊ दे. सारे जीवन जणू सेवेचे साधन व्हावे अशी उत्कटता या ओव्यांत आहे.
पंढरपूरींचा होईन खराटा
झाडीन चारी वाटा विठ्ठलाच्या
विठोबा-रखुमाईच्या संसाराचे वर्णन आहे. विठोबा बाजार करायला जातो, परंतु साधुसंत भेटतात. तो लौकर कसचा येतो ?
विठोबा रात्र झाली पंढरीच्या बाजारात
रुक्मिणी दरवाजांत वाट पाहे
विठोबाला उपवास असावा. रखुमाई राणी त्याला फराळासाठी पेढे नेते, अशी गंमत आहे.
त्या विठ्ठलाशिवाय आम्हाला कोणाचा आधार ? तो विठोबाच सारे काही.
विठोबा माझा बाप रखुमाई माझी आई
बहीण चंद्रभागा पुंडलीक माझा भाई
असे हे नाते स्त्रियांनी जोडले आहे.
पंढरपुराला जाण्याचा रस्ता नीट ठेवावा. परंतु एखादा रस्त्यातून खणून माती नेतो. खळगे पडतात. गाड्या उलटतात:
पंढरीची वाट कोणा पाप्यानें नांगरीली
गाडी बुक्क्याची उधळली विठ्ठलाची
पंढरपुरचा जसा महिमा, तसाच कोल्हापूरच्या अंबाबाईचाही:
चला जाऊं पाहूं कोल्हापुरी राहूं
ओंवियांत गाऊं अंबाबाई
अंबाबाईच्या देवळाभोवती सर्व कारागिरांची वस्ती आहे. तेथे तांबट आहेत, सोनार आहेत; दागिने पटवणारे पटवेकरी आहेत. विणकरही सभोवती आपले माग चालवीत आहेत व अंबाबाईचा पीतांबर विणीत आहेत. शहराच्या बुरुजांवर तोफा आहेत, दरवाज्याजवळ अंबाबाई रक्षणार्थ बसली आहे :
कोल्हापुर शहरी बुरुजाबुरुजा भांडी
वेशीच्या पहिल्या तोंडी अंबाबाई
पुण्याच्या पर्वतीचे वर्णन नंतर दिले आहे. पुढील प्रसिध्द ओवी सर्वांस माहिती :
येथून नमस्कार पुण्याच्या पर्वतीला
दुष्टांच्या संगतीला लागूं नये