सासरी जातांना डोळयांना येते पाणी
सासरी जाते तान्ही उषाताई २४१
सासरी जातांना करीते फुंदफुंद
डोळे झाले लालबुंद उषाताईचे २४२
सासरी जातांना डोळयांना येतें पाणी
बाप म्हणे शहाणी लेक माझी २४३
सासरी निघाली पहिल्या पहिल्यानें
शब्दही भावाच्याने बोलवेना २४४
सासरी जातांना उषाताई रडे
पदरी बांधी पेढे भाईराया २४५
सासरी जातांना डोळयांना आल्या गंगा
महिन्याची बोली सांगा बाप्पाराया २४६
सासरी जातांना बघते मागेपुढे
जीव गुंते आईकडे उषाताईचा २४७
सासरी जातांना माय धरीते पोटाशी
तान्हे कधीं ग भेटशी उषाताई २४८
सासरी जातांना उषाताई मुसमुशी
शल्याने डोळे पुशी भाईराया २४९
सासरी जातांना गाडी लागली जाईला
हांका मारीते आईला उषाताई २५०
सासरी जातांना गाडी लागे चढणीला
ये हो म्हणे बहिणीला भाईराया २५१
सासरी जातांना डोंगर आले आड
जातांना उषाताईला मागे पाहून येती कढ २५२
सासरी जातांना डोळयांना नाही पाणी
आई म्हणे लेक शहाणी उषाताई २५३
घातली पदरी पोटची मी लेक
करा देखरेख माय म्हणे २५४
पदरी घातला पोटचा मी हो गोळा
भरून येतो डोळा माय म्हणे २५५
पोटच्या मुलीपरी करा माझ्या हो तान्हीला
काय फार सांगूं माय म्हणे हो तुम्हाला २५६
मायेच्या डोळयांनी सुटल्या शतधारा
कन्येच्या पाठीवरून फिरवी कांपर्या हाताला २५७
बाप म्हणे लेकी साखरेचा घडा
जाशी परघरा जीव होई थोडाथोडा २५८
लेकीच्या रे बापा धन्य धन्य तुझी छाती
काळजाचा घडा देतोस परक्या हातीं २५९
लेकीच्या रे बापा धन्य धन्य तुझे मन
काळजाचा घडा करिशी परक्या आधीन २६०