दुरून दिसतो हालतो, चालतो
सखा नारिंग झेलतो गोपूबाळ २०१
मायेच्या पाठीवर बाळ बैसले जाऊन
माय झाडीतें वाकून अंगणाला २०२
छंदकर बाळ छंदाला काय देऊं
नको असा हट्ट घेऊं तान्हेबाळा २०३
छंदकर बाळ छंदाला दिल्या लाह्या
खेळतो माझा राया कौतुकाने २०४
छंदकर बाळ छंद घेतलासे रात्रीं
चंद्रमा मागे हातीं खेळावया २०५
पाळण्याच्या दोर्या धरून उभा राहे
चंद्रमा दे ग माये खेळावया २०६
माझ्या अंगणात उडे, बागडे कावळा
जरी दिसतो बावळा बाळा गोड २०७
माझ्या अंगणात कावळा का का करी
बाळाला हांका मारी खेळावया २०८
माझ्या अंगणात कावळयांची गर्दी
बाळाला माझ्या सर्दी सांगा त्यांना २०९
माझ्या अंगणात नाचते चिमणी
बाळाला खेळणी देवाजीचीं २१०
माझ्या अंगणात चिमणी वेंची दाणे
धांवून बाळकाने उडवीली २११
माझ्या अंगणात हिरवा पोपट बोलतो
चोंचीला धरूं बघतो तान्हेबाळ २१२
माझ्या अंगणात साळुंकी मंजुळ बोले
नाचतो प्रेमें डोले तान्हेबाळ २१३
चुलीच्या जवळी मनी मांजरीची पिले
खेळती माझीं बाळे त्यांच्या संगे २१४
कुस्कुरी मांजरी परी न बाळा चावे
बाळ माझे हवे प्राणिमात्रा २१५
ओसरीच्या वरी मोत्या भू भू भू भूंकतो
तान्हा ग ओढतो त्याचे पाय २१६
माझ्या अंगणात पिवळया लाल कर्दळी
बाळाची वर्दळी चारी दिशा २१७
माझ्या अंगणात लाविल्या तुळशी
नाही होणार आळशी तान्हेबाळ २१८
माझ्या अंगणात तुळशीचा वाफा
गोविंद घाली खेपा मंजुळींना २१९
माझ्या अंगणात शोभती दुर्वा, फुलें
खेळाया येतीं मुले बाळासंगे २२०