पायी साखळ्या तोरड्या पाय भरले चिखलात
लेकी दिल्या कोकणात बाप्पाजींनी ३२१
चंद्रहार ग तुटला टिकल्या झाल्या खोलीभर
पदराने गोळा कर उषाताई ३२२
तिन्हीसांजा झाल्या आले लक्ष्मीचे धनी
दिवे लावा खणोखणी झगमगीत ३२३
तिन्हीसांजा झाल्या लक्ष्मीचा डामडौल
बाळराजासाठी गवळ्याचा वाडा खोल ३२४
तिन्हीसांजा झाल्या दिव्यांची जलदी करा
लक्ष्मी आली घरा मोत्यांनी ओटी भरा ३२५
तिन्हीसांजा झाल्या दिवा ओसरीबाईला
सोड वासरें गायीला गोपूबाळा ३२६
तिन्हीसांजा झाल्या दिवे लावू कोठे कोठे
चिरेबंदी वाडे मोठे बाप्पाजींचे ३२७
तिन्हीसांजा झाल्या कामाची झाली घाई
गोवारी आणि गायी रानांतून ३२८
तिन्हीसांजा झाल्या घालूं चुलीत विस्तव
आधी बाळाला निजव उषाताई ३२९
तिन्हीसांजा झाल्या दिवा राईबाई
गवळी बांधी गायी मथुरेचा ३३०
तिन्हीसांजा झाल्या दिव्याला भरवण
वाचीती रामायण दादाराया ३३१
तिन्हीसांजा झाल्या दिवे लावू कोठे कोठे
चौसुपी वाडे मोठे बाप्पाजींचे ३३२
लक्ष्मीबाई आली तिन्हीसांजांच्या भरात
कुंकवाचा पुडा साक्ष ठेविली घरात ३३३
लक्ष्मीबाई आली तांब्याने दूध घाली
बाळा राजसाच्या घराला मानवली ३३४
तिन्हीसांजा झाल्या गुरांच्या गोंधळी
लक्ष्मी पूजिली तांदुळांनी ३३५
देणे देवाजींचे मनुष्याने काय द्यावे
माझ्या ग बाळाला लक्ष्मीने साह्य व्हावे ३३६
लक्ष्मीबाई आली शेताचा बांध चढे
हाती गोफण पाया पडे गोपूबाळ ३३७
लक्ष्मी की आली पांगळ्या पायांची
बाळाजवळ बोली केली कधी नाही मी जायाची ३३८
लक्षुमी चंचळ हिंडते बाजार
धरिते पदर गोपूबाळाचा ३३९
लक्षुमी चंचळ घर शोधतां भागली
माझ्या घरात राहिली दादारायांच्या ३४०