सुखदु:खाचे अनुभव : ओव्या
सासरी सासुरवास माहेरी माहेरवास
सत्तेचा परी घास सासर्यास १
सासरचे बोल कडू कारल्याचा पाला
गोड बोलूं दिली मला बाप्पाजींनी २
सासरचे बोल जसे कारल्याचे वेल
गोड कधीं का होईल काहीं केल्या ३
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी
सैल कर माझ्यासाठी भाईराया ४
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी
माने बसल्या न सुटती कांही केल्या ५
सासरचे बोल जसा वळचणीचा वांसा
लागतो ठसाठसा येतांजातां ६
सासरचे बोल जसे पाण्याचे शिंतोडे
पहावें माझ्याकडे भाईराया ७
सासरचे बोल कडू काडेकिराईत
जरी नाही गिळवत गोड मानी ८
सासरचे बोल कडू विषाचे ग प्याले
तुझ्यासाठी गोड केले मायबाई ९
सासरचे बोल जसे निवडुंगांचे घोंस
जातीवंताच्या मुली सोस उषाताई १०
सासरचे बोल जसे मिरियांचे घोंस
शीलवंताच्या ग लेकी तूं सारे सुखें सोस ११
सासरचे बोल भाऊ ऐकतो चोरोनी
नेत्र आले ग भरोनी भाईरायाचे १२
दीर बोलती दीरपणी नणंदा बोलती टाकूनी
वाग पायरी राखूनी उषाताई १३
सासूचा सासुरवास नणंदाबाईची जाचणी
कशी कोमेजून गेली माझी शुक्राची चांदणी १४
सासूचा सासुरवास रडवी पदोपदी
लेक थोराची बोलेना कोणाशी परी कधीं १५
बापें दिल्या लेकी कामाच्या खळाळयाला
हिरवी लवंग मसाल्याला चला कुटू १६
बापे दिल्या लेकी वाटेवरल्या गोसाव्याला
पालखींत बैसायाला दैव तिचें १७
बापे दिल्या लेकी नाही पाहिले घरदार
पाहाणारा परमेश्वर दुसरे कोण १८
बापे दिल्या लेकी नाही पाहिले धनबीन
एक पाहिले निधान कुंकवाला १९
बापे दिल्या लेकी आपण बसले सुखें ओटी
मायेला चिंता मोठी वागण्याची २०