त्यांची चतुर्विध दृष्टि आहे. एकांगी नाही. या चारी गोष्टी सत्य व अहिंसेच्या पायावर उभारता आल्या तरच खरे स्वराज्य लाभेल असे त्यांचे मत आहे. यालाच ते स्वराज्याचा चौरस Square of Swara असे म्हणतात. या चौरसाच्या एका बाजूस अर्थकारण व राजकारण आहे. दुस-या बाजूस धर्म व नीति आहे. असा हा चौरस आहे. अर्थकारण आणि राजकारण यात धर्म व नीति आणणे हे महात्माजींच्या जीवनाचे ध्येय आहे. आजपर्यंत जे धर्मशिक्षक झाले त्यांनी राज्यव्यवहार करताना थोडीशी हिंसा अपरिहार्य आहे असे सांगितले. ही हिंसा ते गृहितच धरून चालले. ही हिंसा राजकारणातूनहि कशी कमी करता येईल व एक दिवस अजीबात कशी नष्ट करता येईल याचा विचार आजपर्यंत कोणी केला नाही. तसेच अर्थकारणात, व्यापारात खोटेपणा थोडा यायचाच, थोडी लबाडी असायचीच असे जणू आपण म्हणत होतो. सत्य, अहिंसा इत्यादि तत्त्वे आपण यतीच्या, साधुसंतांच्या कम्पाउडांत नेऊन ठेवून दिली व्यवहारात असे कसे चालेल असे म्हणत बसलो. परंतु महात्माजींनी ही परंपरा झुगारून दिली आहे. आजच्या अर्थकारणांत अन्याय, पिळवणूक असेल, खोटेपणा असेल तर निराळेच अथशास्त्र निर्मूया असे ते म्हणू लागले. चरका, ग्रामोद्योग वगैरेंच्या द्वारा अर्थकारणांत ते समता आणा असे शिकवू लागले. धर्मकारणातही सत्य व अहिंसा त्यांनी आणिली. ते सर्व धर्म समान मानतात. ज्या अर्थाने महात्माजी सर्व-धर्म-समानत्वाचा स्वीकार करतात त्या अर्थाने पूर्वी कधी केला गेला नव्हता. सर्व धर्म एकच आहेत; हिंदुधर्म, ख्रिश्चनधर्म, मुसलमानी धर्म, बुध्दधर्म इत्यादि धर्म एकाच भूमिकेवर उभे आहेत असे कोणी म्हटले तर आपणांस पटणार नाही, परंतु महात्मा गांधी ज्या दृष्टीने विचार करतात, त्या दृष्टीने सर्वधर्म समान आहेत, असे मानण्यास प्रत्यवाय वाटत नाही.
अनासक्ति-योग लिहितांना महात्माजींनी कोणती दृष्टि घेतली आहे? अर्जुन लढत नसतो. तो युध्द टाळू पाहातो. श्रीकृष्ण त्याला झगडा करायला उद्युक्त करतात. गीता ही युध्दार्थ प्रवृत्त करणारी आहे ही गोष्ट महात्माजी मानतात. कोणी म्हणतात की महात्माजी तर अहिंसा शिकवितात आणि पुन्हा गीतेला कसे मानतात? अर्जुन शस्त्र खाली टाकतो. महात्माजीहि शस्त्र दूर ठेवा सांगत आहेत. महात्माजींची भूमिका व अर्जुनाची भूमिका दोन्ही समान आहेत, असे काही प्रवचनकार अद्यापहि सांगतात. अर्जुन काय म्हणत होता?
''यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्'' ॥
अर्जुन म्हणतो, ''हाती शस्त्र न घेतलेल्या व प्रतिकार न करणा-या मला जरी कौरवांनी मारले तरी तेही माझ्या कल्याणाचेच होईल.'' अर्जुन निःशस्त्र व अप्रतिकार असा आहे. परंतु महात्माजींची भूमिका निराळी आहे. ते हाती शस्त्र देत नाहीत, परंतु प्रतिकार करू नका असे त्यांनी कधीहि सांगितले नाही. अर्जुनाची भूमिका आपण जरा अशी मांडू या; हे इंग्रज आपलेच बंधु. आपण जाति, धर्म, देश यांचे भेद लक्षात आणता कामा नये; त्यांना बंधु म्हणूनच आपण मानले पाहिजे. त्यांनी आपला द्वेष केला तरी त्यांचा आपण नाही करता कामा. त्यांच्यावर प्रेम करावे. (भगवद्गीतेनेहि असा उपदेश ठायी ठायी केला आहे. त्यात काही नवीन नाही.) परंतु भगवद्गीतेच्या शिकवणीचा असा अर्थ नाही की अन्यायाने कोणी राज्य घेतले तरी स्वस्थ बसावे. आपल्या बंधूंनीच राज्य घेतले. घेईनात का. काय हरकत? सर्वस्व घेतले तरी आपण प्रतिकार न करता स्वस्थ बसावे, असे अर्जुन म्हणतो. त्यांनी झगडा सुरू केला, तरी आपण निमुटपणे बसावे असे तो म्हणतो. परंतु अर्जुनाची ही भूमिका मान्य केली तरी जगाचे, समाजाचे, संस्कृतीचे रक्षण होणार नाही. म्हणून श्रीकृष्णानी अर्जुनास या नैर्ष्कम्यापासून परावृत्त केले. अर्जुनाने अहिंसावादाच्या दृष्टीने प्रश्न केलाच नाही. तो का अहिंसेला कंटाळला होता? नाही. अहिंसेचा पूर्वपक्षहि त्याने केला नाही. अहिंसेचा मुद्दा त्याने काढलाच नाही म्हणून त्या मुद्याचे गीतेत खंडनहि नाही. अर्जुनाची भूमिका एवढीच होती की, नातलगांची, आप्तेष्टांची, गुरुजनांची हिंसा करावी की नाही. ज्ञानेश्वरीत अर्जुनाची भूमिका फार उत्कृष्ट रीतीने मांडलेली आहे.