समाजाचा व्यवहार सोडायचा नाहीं. तोच व्यवहार सुंदर, उदार ध्येयवादी करायचा. जेथें असाल तेथेंच ठाण मांडून आपापली कर्में करीत रहा. आपापलें कर्मक्षेत्र सोडूं नका. जसें आपापल्या जागीं राहूनच भीष्माचें रक्षण करा, सेनेचें रक्षण करा. ''यथाभागमवस्थितम्'' असें दुर्योधन आपल्या सैनिकांस म्हणाला, त्याप्रमाणें समाजाचें रक्षण, आपापली कर्में जेथें असाल तेथें नीट करून करा. धंदे असे घ्या कीं जे समाजपोषक आहेत, न्यायाला पोषक आहेत. दारूसारखे धंदे नकोत. समाजाचा नाश करणारे धंदे नकोत. आपापल्या कर्मांनी समाज सुखमय, अहिंसक म्हणजे जेथें अन्याय नाहीं, कोणाला दुःख नाहीं, कोणाचें शोषण नाहीं असा करावयाचा आहे.

''स्वकर्म - कुसुमीं त्यास पूजुनी मोक्ष मेळवी''

स्वतःच्या कर्मांनींच ईश्वराची पूजा करा. समाजाची सेवा समाज म्हणजेच ईश्वर समजून करा. जें कर्म कराल त्यांत सत्य, अहिंसा आणा. सत्य, अहिंसा पाळून जें कांही कराल तीच समाजाची खरी सेवा होईल. सत्य, अहिंसा सोडून जें कराल त्यानें सेवा न होतां उलट हेवाच वाटायचा. हेंच तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान म्हणून महात्माजी कांही निराळें मानीत नाहींत. हें सर्वांगीण तत्त्वज्ञान आहे. अंतरंगक्रान्ति हें बाह्यक्रान्तीचें साधन. अंतरंग निर्मळ करून समाजाच्या बाह्यांगांत क्रान्ति करूं लागलांत म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रान्तिहि होईल. व्यक्तीचा मोक्ष समाजाच्या मोक्षाशी महात्माजींनी जोडला आहे. सभोंवतीं अन्याय, हिंसा असतांना त्या वातावरणांत मी माझा संपूर्ण मोक्ष मिळवूं तरी कसा? माझ्या मोक्षांतहि कांही तरी दोष, काहींतरी कमीपणा तोंवर राहणार. समाज मुक्त नाहीं तोंवर तुम्हीहि मुक्त नाही. म्हणून स्वतःला सुधारीत, स्वतःची कर्मे सुधारीत समाजहि सुधारूं लागा.

महात्माजींनी एक नवीन महान् क्रान्तिकारक उभा केला आहे. जो साधु असून क्रान्तिकारी आहे. साधुता आणि क्रान्तिप्रवणता दोहोंचा रम्य संगम ज्याच्या ठायीं आहे असा नवयुगांतील नवा क्रान्तिकारी त्यांनी उभा केला आहे.

अंतरंगात क्रान्ति व बाहेरहि क्रान्ति करूं पाहणारा, ज्याचें साध्य शुध्द आहे आणि साधनेंहि शुध्द आहेत असा हा क्रान्तिकारक आहे. महात्माजींनीं अशा सर्वांगीण क्रान्तीची दृष्टि देण्याचा प्रयत्न चालविला आहे. सारे लोक एकदम या मार्गानें  जाऊं शकतील असें नाही. सारा हिंदुस्थानहि या मार्गानें एकाएकी जाईल असें नाहीं. परंतु महात्माजींनीं हिंदी राष्ट्रांत एक नवनिष्ठा उत्पन्न केली आहे यांत शंका नाहीं. सर्वांवर कमीअधिक त्या निष्ठेचा परिणाम झाला आहे. याच मार्गानें जाऊं तर स्वतःचें, स्वतःच्या राष्ट्राचें, मानव जातीचें कल्याण आहे असें अंतःकरणांत सर्वांना वाटूं लागलें आहे. महात्माजींचें असें हें जीवनदर्शन आहे. त्यांनीं दिलेलें सर्व जीवनस्पर्शी असें हें कर्मयोगी तत्त्वज्ञान आहे. ही नवीन जीवननिष्ठा स्वतःच्या प्रत्यक्ष आचरणानें ते देत आहेत. आज त्यांचा वाढदिवस. ते बंधनांत आहेत. परंतु त्यांचे विचार जगभर जात आहेत, जात राहतील. बंधनांतून सर्वांना मुक्त करणारें हें तत्त्वज्ञान वाढत जाईल अशी आशा आहे. सात दिवस आपण थोडा फार उहापोह केला, आज तो पुरा करूं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel