अहिंसक समाज निर्मायचा असेल तर यांची कांस धरावी लागेल. चरखा म्हणजे अहिंसेचें प्रतीक. महात्माजी असें म्हणतात यांतील भावार्थ काय? युध्दें टाळणें आणि ग्रामोद्योग यांचा संबंध काय? महात्माजी म्हणतात, आजचीं युध्दें कां आहेत हें लक्षांत घ्याल तर मग माझ्या ग्रामोद्योगानें युध्दाचें कारणच उरणार नाहीं हें तुमच्या लक्षांत येईल. ब्रिटिश लोक हिंदुस्थानावर सत्ता चालवूं इच्छितात. कां? केवळ सत्तेसाठीं सत्ता त्यांना नको आहे. त्यांना व्यापार हवा आहे. व्यापारासाठी त्यांना येथें सत्ता हवी आहे. परंतु आपण जर ग्रामोद्योगाचें ध्येय केलें, ग्रामोद्योग हा जीवनधर्म केला तर? ग्रामोद्योगांनींच गांवच्या आवश्यक गरजा आपण भागवूं लागलों समजा. येथील बेकारी आम्हांला नाहीशी करायची आहे, म्हणून आम्ही आमच्या गावांतच वस्तू निर्मून त्याच वापरण्याचा निश्चय केला आहे, अशी समजा आपण घोषणा केली तर येथें सत्ता चालवायला कोण येईल? जीवनाला आवश्यक अशा गरजांच्या बाबतींत जर आपण सारे स्वावलंबी झालों तर साम्राज्यवादी येथें राज्य करूं इच्छिणार नाहींत. येथें सत्ता चालवण्याची त्यांची इच्छा नाहींशी होऊन जाईल. गांधीजींची अशी ही विचारसरणी आहे. मोठमोठे कारखाने काढून संपत्तींचें केन्द्रीकरण आणि त्याचबरोबर सत्तेचेंहि केन्द्रीकरण करून सर्व जगांत एक राज्य स्थापण्याचा हा काळ आहे असें कोणी म्हणत असतात. जागतिक दळणवळण वाढलें आहे, त्यामुळें आज व्यापारहि सर्वत्र पसरेल. त्यातंच अधिकाधिक जगाचें कल्याण आहे. सारें जग जणूं एक होईल. परंतु असें सांगणारे कितीहि सांगोत, आम्हांला एक गोष्ट दिसत आहे कीं, आजचें दळणवळण हें लुबाडण्यासाठीं आहे. अपहरण करण्यासाठीं हें दळणवळण वाढवण्यांत आलें आहे. हें केन्द्रीकरणहि अशासाठी कीं, कोणत्या तरी राष्ट्राचें प्रभुत्व सर्व जगावर व्हावें. जर्मनी, जपान, अमेरिका, इंग्लंड यासाठींच लढत आहेत. जर्मनीचा पाडाव होईल असें दिसत आहे. इंग्लंड, अमेरिका अखेर विजयी होतील. इंग्लंडहि अमेरिकेचें आर्थिक गुलाम होईल. अमेरिका जगावर प्रभुत्व-आर्थिक प्रभुत्व राखू पाहील. सर्व संपत्ति अमेरिकेंत केन्द्रीभूत होईल. म्हणजे सत्ताहि तेथेंच. रशिया आणि अमेरिका यांची पुढें चुरस लागेल. महात्मा गांधी म्हणतात, हीं युध्दें थांबायची नाहींत. एक महायुध्द संपून दुसरें वीस वर्षांनी आलें. हें दुसरें संपून तिसरें पुन्हा येईल. ही युध्दे थांबवायचीं असतील तर संपत्तीचें केन्द्रीकरण करण्याचा प्रकार नष्टच करायला हवा. आपापल्या आवश्यक गरजा तेथले तेथलेच लोक उत्पन्न करायला उभे रहायला हवेत. यांत स्वदेशी भावना आहे. माझ्या शेजारचे लोक ज्या वस्तु करतात, त्याच मी घ्याव्या. त्यांत शोधबोध करावे. सुधारणा कराव्या. शेजारच्या, जवळच्या बांधवांचे धंदें सुधारून त्यांची उन्नति करावी आणि त्या वस्तूंचा मीं उपभोग घ्यावा. कोणतीहि वस्तु घेतांना ती कोणीं निर्माण केली, कोठें निर्माण झाली हें सदैव पाहिलें पाहिजे. वस्तु विकत घेतांना आपण मोबदला देतों. परंतु हा मोबदला कोठें जात आहे, कोणाला मिळत आहे, याची सदैव जाणीव आपणांस हवी. ज्याला मोबदला जातो त्याचें पोट भरतें कीं नाही? मोबदला दिला तो योग्य आहे कीं नाहीं? याचा विचार वास्तविक करायला हवा. आजचें देवघेवींचें सूत्र ''स्वस्तांत स्वस्त विकत घेऊन, महागांत महाग विकायचें'' असें आहे.To Buy in cheapest and sell in the dearest market. अमेरिका, जपान वगैरे देश जेथें स्वस्तांत स्वस्त माल मिळेल तेथून घेतात आणि जेथें महागांत महाग किंमतीस विकतां येईल तेथें विकतात.