जे साधुसंत आपल्या आचरणाने समाजांत, मानवी जीवनांत प्रेमस्नेह आणू पाहतात, मांगल्य निर्मूं बघतात, अशा प्रयत्नशील संतांचे संरक्षण करण्यापुरते शस्त्र उपयोगी आहे. शस्त्रबल नकारात्मक आहे, भावात्मक नाही. ते संहारक आहे, निर्माण करणारे नाही. ते ऋण आहे, धन नाही. (निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नाही.) भावरूप प्रयत्न कोणी करायचा? प्रत्यक्ष निर्मिति कोणी करायची? संतसज्जनांचेंच ते जीवितकार्य असते. म्हणून समाजधारणेस शस्त्रापेक्षाहि साधुत्वशक्तीच अधिक उपकारक आहे. समाजांत साधुत्व वाढत राहिले पाहिजे. सद्गुणसंवर्धन सदैव होत राहिले पाहिजे. शस्त्रास्त्रांनी साधुत्व वाढण्याऐवजी -हास पावू लागते. म्हणून साधुसंत स्वतःचे रक्षण, आपल्या साधुत्वाचा सांभाळ स्वतःच्या बलिदानाने करतात. ''अक्रोधेन जयेत् क्रोधम्'' हाच त्यांचा विधायक मंत्र. अशी वचने आपण ऐकतो ती उगीच नाहीत. संतांच्या अनुभवाचे नि शिकवणीचे त्यांत सार आहे. असाधुत्वाला साधुत्वाने जिंका. महात्मा गांधींच्या सर्व तत्त्वज्ञानाचा या विचारांत आरंभ आहे. त्यांचे सारे जीवनदर्शन या मूलभूत विचारांतून विकसत आले आहे. शस्त्रबल खाजगी असो वा स्टेटचे, शासनसंस्थेचे असो, ते शेवटी अपुरे पडते. साधुत्व वाढावे म्हणून सक्ती किती उपयोगी पडणार? राज्यसत्तेचे सर्वंकष प्रभुत्व चालू देणे योग्य नाही. शस्त्रबल, सक्ती ही साधुत्ववृध्दीला कितीशी हातभार लावणार? सत्य, अहिंसा यांच्याकडे जायची प्रवृत्ति स्वतःच्या प्रयत्नांनीच व्हायला हवी. स्वतःचा आत्माच जागा व्हायला हवा. प्रयत्नांतूनच खरी आत्मप्राप्ति. स्वतःची सुधारणा व इतरांची सुधारणा यांत द्वैत नाही. आपली सुधारणा झाली तर जगाचीहि होईल. माझ्यांत साधुत्व वाढले तर जगांतहि वाढेल. दैवी संपत्ति वाढवणारे द्वेषमत्सर नाही फैलावीत. भौतिक बाबतीत एकाची संपत्ति वाढली तर दुस-या कोणाची तरी कमी होते. तसा येथे प्रकार नाही. दैवी संपत्तीचा हा विशेष आहे. दैवी संपत्तीचे लोक समाजधारणेस अधिक महत्त्वाचे असतात. साधुवृत्ति वाढवणायाचा समजांत जसजसा अधिक प्रभाव पडूं लागेल, तसतसा राज्यसंस्थेचा आपोआप संकोच होऊ लागेल. तिची जरूरीच वाटेनाशी होईल. साधुत्वाची वाढ ज्या प्रमाणांत होईल त्या प्रमाणांत शासनसंस्थेचे प्रभुत्व, अस्तित्व घटत जाईल. साधुत्वानेच जर असाधुत्वाला जिंकायचे तर राज्यसंस्था दंड कोणास करणार, शिक्षा कोणास ठोठावणार? साधुत्वाचे हे बळ कोठे तरी कमी पडते म्हणून राज्यसंस्थेची आवश्यकता भासते.
यतिधर्म नि राजधर्म
आजपर्यंत राजधर्म आणि यतिधर्म हे दोन अलग धर्म मानले गेले. यतिधर्म राजधर्माहून श्रेष्ठ मानला जातो. त्याच्या कारभारांत राजधर्म ढवळाढवळ नाही करीत. राजसत्तेला राजधर्म आणि प्रजेला प्रजाधर्म घालून देणे हे यतिधर्माचे काम आहे. युरोपांत मध्ययुगांत खिस्ती धर्माच्या इतिहासांतहि असे थोडे दिसते. पवित्र रोमन साम्राज्यांत ही कल्पना दिसून येते. साधुत्वाने समाजाचे रक्षण करणारे हे राजाहून श्रेष्ठ आहेत. पोप, बिशप वगैरे राजाहून श्रेष्ठ. महात्मा गांधींच्या अंतःकरणांत हे असे विचार आहेत. गांधीजी कर्मयोगी आहेत. कर्मयोगाचे विवेचन भगवद्गीतेत आहे. या अर्थाने ते गीतेचे उपासक आहेत. परंतु गीता हा राजधर्माचाहि ग्रन्थ आहे. ज्यावेळेस इतर प्रयत्नांनी प्रश्न सुटत नाही तेव्हा युध्द धर्म्य ठरते. त्या युध्दास प्रवृत्त करण्यासाठी ही गीता आहे. शिष्टाईचे सारे उपाय थकले. स्वतः श्रीकृष्ण शिष्टाईस गेले. सारे प्रयत्न विफल झाल्यावर युध्दाशिवाय गत्यन्तर नव्हते. ते करणे भाग पडले. परंतु महात्मा गांधी या महाभारतीय युध्दाकडे कोणत्या दृष्टीने बघतात?