"The real sovereignty of people" हे त्याचे शब्द. रूसोचे हे शब्द घेऊन महात्माजी लिहितात, ''मनुष्य जन्मतः स्वतंत्र आहे. रूसो म्हणतो, लोकांची सत्ता सर्वत्र हवी. परंतु आज ज्या काही लोकशाह्या जगांत आहेत त्यांच्याकडे जर पाहिले तर आपणांस काय दिसेल? लोकशाहीत जनतेची सत्ता हवी असे रूसो म्हणे. परंतु खरी लोकसत्ता आज कोठेही नाही. मध्ययुगांतील सरंजामशाही व आजची लोकशाही यात विशेष अंतर आहे असे मला वाटत नाही. सरंजामशाही कोलमडून पडून जेव्हा लोकशाही आली तेव्हा सर्व दुःखांवर रामबाण उपाय सापडला असे सर्वांस वाटले. परंतु वस्तुस्थिति काय आहे? ते सरंजामशाही सरदार आपापल्या उंच किल्ल्यांतून रहात. वेळी अवेळी केव्हातरी लोकांवर स्वारी करीत. लूट घेऊन जात. अर्धवट रानटी, असंघटित, लहरी, असे ते सरंजामशाही सरदार होते. परंतु ते गढीवाले, मधून मधून विद्युत्पाताप्रमाणे येऊन लूटमार करणारे सरदार जाऊन त्यांच्याऐवजी आज लुटारू पुंजिपति आले आहेत. लहरी लूटमार करणारे गेले परंतु आज कायदेशीर रीत्या मुकाटयाने सर्व जगाची संघटित रीतीने पिळवणूक करणारे भांडवलदार दिसत आहेत. संघटित डाकूगिरी आज चालली आहे. किल्लेदार गेले व भांडवलदार आले. सर्व देशांतून ही अशी पिळवणूक चालली आहे. ती हिंसा हरघडी चालली आहे. हे अपरंपार रक्तशोषण चालले आहे. ज्या देशांत अशी ही पिळवणुकीची हिंसा सभोवती आहे त्या देशांत राहून मी अहिंसा पाळतो असे म्हणणे हा अहंकार आहे. हा खोटा अभिमान आहे.'' म्हणून सर्व जगाच्या विरुध्द बंड केले पाहिजे असे महात्माजी म्हणतात. त्या पूर्वीच्या मध्ययुगांतील लुटारूंची लोकशाहीच्या नावाखाली बिनबोभाट चाललेली असते. लोक एकीकडे भ्रमांकित असतात की, आपण लोकसत्ता अनुभवीत आहोत. शांततेचा काळ आहे, सत्याचा काळ आहे, असा भ्रम हे भांडवलदार निर्माण करीत असतात. ही स्थिति फारच धोक्याची आहे. उघड अन्याय दिसला तर मनुष्य बंडास तरी प्रवृत्त होतो; परंतु जेथे लोकशाहीच्या बुरख्याखाली पिळवणूक केली जात असते, तेथे पटकन् काही लक्षांतहि येत नाही. आतून रक्तशोषण तर सारखे होत असते; पण कोण कसे हे रक्तशोषण करीत आहे हे जनतेस कळत नाही. ते सरंजामशाही सरदार शरीरेच बंधनांत घालीत; परंतु आजची भांडवलाशाही मनाला व आत्म्यालाहि गुलाम करीत आहे. हळूहळू जनतेचा आत्माच आज मारला जात आहे. आत्म्याला इजा पोचत आहे.''
असे हे जग कसे सुधारावयाचे? बहुजनसमाजास अन्नवस्त्र कसे द्यावयाचे? त्यांची खरी नैतिक सत्ता कशी स्थापवयाची? जगाची सुधारणा करण्याचे दोन मार्ग रूढ आहेत : १. सुधारणावाद, २. सशस्त्र क्रान्तिवाद; परंतु हे दोन्ही मार्ग फसले आहेत. सुधारणावादी हळूहळू सुधारणा करावी असे म्हणतात. ते काही तरी थातुर मातुर करू पाहतात. परंतु डोंगराला दुखणे व शिंपीत औषध तशांतली त्यांची गत होते. अशा वरवरच्या मलमपट्टीने काही एक होणार नाही. सामाजिक व राजकीय अन्यायांच्या मुळाशी ते जात नाहीत. आणि ते क्रांतिवीर एकदम हिंसेने सर्व बदल करू पाहतात. परंतु तो बदलहि वरपांगी होतो. तात्पुरती एकाच्या हातची सत्ता दुस-याच्या हाती गेली असे दिसते. परंतु त्यानेहि प्रश्न सुटत नाही. जनतेची नैतिक शक्ति जोपर्यंत जागृत झालेली नाही तोपर्यंत ख-या अर्थाने प्रश्न सुटणार नाही. राज्यसंस्थेची जसजशी आपण सुधारणा करूं तसतशी सर्व समाजांत सुधारणा होईल असे म्हणणारे एका गोष्टीकडे दुर्लक्ष करितात. राज्यसंस्थेत जे पाप दिसते ते कोठून आलेले असते? सामाजिक पापांतूनच राज्यसंस्थेतील पाप जन्मते. समाजांतील पापाचे प्रतिबिंब शासनासंस्थेत पडत असते. समाजांतील जी आर्थिक घटना असते तिच्या रक्षणासाठी म्हणून राज्यसंस्था असते. समाजरचनेतून राज्यसंस्थेतील पाप जन्मते. हे जे समाजांतील पाप ते जर आपण न काढू तर राज्यसंस्था तरी कशी सुधारणार? समाजसुधारणा आधी की राज्यसंस्थेची सुधारणा आधी? महात्माजी सुंदर दृष्टांन्त देऊन लिहितात, ''समुद्रातील लाटा या उगीच नाही उठत.