अहिंसेनेच खरे स्वराज्य मिळेल असे महात्माजी मानतात. अहिंसेनेच असे ते कां म्हणतात? स्वराज्य हे आपले साध्य आहे. अहिंसा हेच साधन का? हिंसेचे साधन का वापरूं नये? हिंसेचे साधन वापरून मिळणारे स्वराज्य मला नको असे ते कां म्हणतात? श्रेष्ठ साध्यासाठी हीन साधन असले तरी चालेल असे आपण आजपर्यंत शिकत आलो. महात्मा गांधींनी हा सिध्दांत खोटा ठरविला आहे. हीन साधनांचा अवलंब करून श्रेष्ठ साध्याची प्राप्ति होऊच शकत नाही. साध्यप्राप्तीचे नाना मार्ग आहेत. विनवणी करून, कोर्टकचेरीचा अवलंब करून, थपडा पडले एवढेच नव्हे तर तो लढा सर्वांहून अधिक तीव्रतेने ते चालवीत आहेत. त्यांना आसक्ति व मोह नाही. तरीहि ते स्वराज्यासाठी तडफडत आहेत. त्यांचा मार्ग कोणताहि असो. तो मार्ग कोणास पसंत असो, नसो. परंतु सार्वजनिक सेवा, हे स्वराज्याचे काम, ते जितक्या तीव्रतेने करीत आहेत तसे कोणी करीत आहे असे दिसणार नाही क्षणाचीहि त्यांना विश्रांति नाही. अक्षरशः अहर्निश ते झगडत आहेत. झोपेत स्वप्न पडले तरी ते स्वराज्यासंबंधी पडावे. या आताच्या ४२ च्या लढयाच्या आरंभी ते म्हणाले, ''माझी झोप नाहीशी झाली आहे.'' स्वराज्यार्थ त्यांचे जे हे अविरत परिश्रम चालले आहेत, त्यात त्यांचा हात धरणारा कोणीहि नाही. कोणत्या बुध्दीने हा निस्संग पुरुष हिंदी स्वातंत्र्याच्या या लढयांत सामील झाला असावा? ते म्हणतील, ''संतति संपत्तीची अभिलाषा मला नाही. मला कशाची आसक्ति नाही. काही प्राप्त करून घ्यायचे आहे असेहि नाही. मी आत्मकल्याणार्थ हा झगडा चालविला आहे.'' अर्जुन म्हणाला होता,''माझे आत्मकल्याण होत नसेल तर त्रैलोक्य राज्य मिळाले तरी ते मला नको आहे.'' युध्द करून आत्मकल्याण साधेल असे जेव्हा श्रीकृष्ण त्याला पटवतात तेव्हाच तो युध्दप्रवृत्त झाला. हे युध्द कर. आत्मकल्याणाशी हे विसंगत नाही, असे भगवंतांनी त्याला सांगितले. गीतेत हे वैशिष्टय आहे. अर्जुनाच्या भूमिकेचे हे वैशिष्टय आहे. पूर्वपक्षी आत्मकल्याणाची दृष्टि घेणारा असे धार्मिक ग्रंथांत बहुधा आढळणार नाही. पूर्वपक्षी नेहमी सांसारिक दृष्टीचे असतात, आणि गुरु त्याला आत्मकल्याणाकडे आणीत असतो. सामान्य मनुष्य नेहमी असे विचारतो की, ''आम्ही भौतिक सुखाच्या मागे का लागू नये?'' आणि गुरु सांगत असतो, ''हे भौतिक सुखभोग सोड.'' जगांतील धार्मिक ग्रंथ पाहिले तर अशा प्रकारचे धार्मिक व नीतीचे संवाद सापडतात. परंतु भगवद्गीतेतील पूर्वपक्षी निवृत्तकाम होऊ पाहणारा, विरक्त असा आहे. आत्मकल्याणाची भाषा वापरणारा आहे. आत्मकल्याण श्रेष्ठ असे त्याला सांगण्याची जरूरीच नाही. त्याला एवढेच पटवून द्यायचे आहे की जे युध्द तू टाळू पहात आहेस, ते युध्द आत्मकल्याणास बाधा आणणार नाही. न्यायासाठी अनासक्तबुध्दीने ते युध्द तू कर.
श्रीकृष्ण ज्याप्रमाणे अर्जुनाला म्हणाले, ''हा लढा टाळू पाहशील तर आत्मकल्याण गमावशील. आत्मकल्याणास विरुध्द असे मी तरी कसे सांगेन? आत्मकल्याणासाठीच लढा कर-'' त्याप्रमाणे महात्मा गांधीहि आत्मकल्याणार्थ हा लढा लढत आहेत. आत्मकल्याणाची दृष्टि असलेला हा महात्मा पुढे होऊन राजकारण आज करीत आहे. समाजांत अशा पुरुषांची एक निराळीच कोटि असते. ही सामान्य माणसांची कोटि नव्हे.