महात्माजी प्रत्येक क्षणीं सत्याचें चिंतन करतात. ते म्हणतात, मी पावलोपावलीं क्षणशः कणशः सत्यसंशोधन करणारा आहें, आणि म्हणून मी सनातनी आहें. एकदां एकानें गांधीजींना प्रश्न केला,''तुमच्या वर्तनांत अत्यन्त विसंगतिहि दिसते.'' ते म्हणाले ''अत्यन्त विसंगत, परंतु एका अर्थीं तें अत्यन्त सुसंगत आहे. कारण त्या त्या वेळेस मला जें सत्य वाटतें तें मी बोलतों. या सर्व विसंगतींतून सत्याचा एक सुसंगत शोध आहे.'' सत्याचें ज्ञान कोणत्याहि व्यक्तीला पूर्णपणें कधींच होत नसतें. अवतारी पुरुष घेतला तरी त्याचेंहि सत्याविषयींचें ज्ञान कांहीं अंशीं अपूर्णच असणार असेंही गांधीजी म्हणतात. ऐतिहासिक राम, कृष्ण अपूर्ण आहेत. काल्पनिक, ज्ञानमय श्रीकृष्ण पूर्ण आहे. तो ऐतिहासिक प्रत्यक्ष व्यवहारांत वावरणारा श्रीकृष्ण त्यावेळच्या इतरांच्या मानानें पूर्ण होता. परंतु संपूर्ण सत्याच्या दृष्टीनें तो अपूर्णच. सत्यसंशोधन हें सारखें चालू असावें लागतें, तें पुढें पुढें नेत असतें, नवीन नवीन दर्शन घडवीत असतें. बुध्दीला प्राप्त होणारे सिध्दान्त, त्यांचें स्वरूप बदलतें. आपल्याला चुका दिसूं लागतात. जसजशी पूर्णतेकडे अधिकाधिक प्रगति होईल, तसतशी सत्यदर्शनाची अधिकाधिक प्रचीति येईल म्हणून सत्याची उपासना करणारा विसंगतीनें गांगरत नाहीं. याची विसंगति विकासाची खूण असते. शाश्वत सत्याचें चिंतन करीत तो वागणार. सत्य, अहिंसा यांच्या आविष्कारासाठीं विधिनिषेध बदलावे लागतात. क्रान्ति करावी लागते. ही क्रान्ति कशी करावी याची नीट कल्पना येईपर्यंत क्रान्ति शब्द गांधीजींनीं वापरला नाहीं. परंतु पुढें त्यांना स्वतःच्या अहिंसक क्रान्तीचें संपूर्ण दर्शन झालें. ते म्हणाले, ''माझा क्रान्तिमार्ग, माझें क्रान्तिशास्त्र सर्वश्रेष्ठ आहे.'' प्रजा जोंपर्यंत अहिंसक आहे तोंपर्यंत तिला क्रान्तीचा हक्क आहे. एखादा अन्याय जावा म्हणून तिनें अहिंसक प्रतिकार करावा. पूर्वी ह्या गोष्टी यति करीत. अहिंसेनें क्रान्ति कशी करावी हें यतीनें आतां सर्व समाजाला शिकविलें पाहिजे. अहिंसक क्रान्तीचें तत्त्व व्यक्तीपुरतें न ठेवतां सर्व समाजांत फैलावलें पाहिजे. आणि जनतेची शक्ति अहिंसक रीतीनें जागृत करून राज्यसत्तेकडून होणारा अन्याय दूर केला पाहिजे. अहिंसा न सोडतां असें हें राजकारण करायचें आहे.
गांधीजी जेव्हां सत्य म्हणतात तेव्हां त्याचा अर्थ काय असतो? आपण या गोष्टीचा थोडा विचार करूं या. सत्यासंबंधींच्या दोन कल्पना असतात.
१. वस्तुस्थितीचें ज्ञान; जें दिसतें तें खरोखर तसें आहे कीं भिन्न आहे हें समजून घेणें.
२. दुसरी गोष्ट म्हणजे जें खरोखर आहे तें चांगलें आहे कीं वाईट आहे हें समजून घेणें.