प्रवचन ५ वे
काल आपण सत्यासंबंधीं बोलत होतों. वस्तुस्थितीचें संशोधन नीट व्हायला मनःशुध्दीचीहि जरूर असते. परंतु वस्तुस्थिति समजून घेणें म्हणजे तरी काय? वस्तुस्थितीचें सत्यस्वरूप असा शब्दप्रयोग जेव्हां आपण करतों, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? सत्य म्हणजे काय हा विचार सुरू केला की त्यांतून आपल्यासमोर दोन प्रश्न उभे राहतात.
१. आहे काय?
२. काय असायला हवें?
'आहे काय' मध्यें जें प्रत्यक्ष असतें त्याचें आपण याथातथ्यानें वर्णन करीत असतों. जें समोर सर्वत्र दिसतें त्याचें निवेदन. भौतिक शास्त्रांत या गोष्टीवरच अधिक भर देण्यांत येत असतो. परंतु मनुष्य प्रयोगालयांतून प्रत्यक्ष संसारांत जेव्हां येतो, खोली सोडून सारा व्यवहार पाहूं लागतो, तेव्हां नुसतें काय आहे हें पाहून त्याला सत्य समजलें असें म्हणता यावयाचें नाहीं. समाजांत वागतांना आपण पदोपदीं कसें असावें, कसें वागावें, काय नसावें, कशांत कल्याण -इत्यादि गोष्टी आपल्या डोळयांसमोर उभ्या असतात. समाजांत वागतांना सद्सद्विवेक करावा लागतो. नुसतें वस्तुस्थितिनिवेदन करून भागत नाहीं. आणि भौतिक सृष्टींत निरीक्षण करतांना सुध्दां कांही ठिकाणीं वाइटाचा अनुभव येतो, कांही ठिकाणीं चांगल्याचा. हा देखावा सुंदर आहे असें आपण म्हणतों; हा देखावा अप्रसन्न आहे, हें दृश्य विद्रूप आहे असें आपण म्हणतों. आपण अमुक चांगलें, अमुक वाईट हें सुंदर, हें कुरूप असें जेव्हां म्हणतों तेव्हां चांगलें काय, सुंदर काय यासंबंधीचीं एक आदर्श कल्पना, पूर्णत्वाची कल्पना आपल्या मनांत असते. मनांतील कोणत्या तरी एका आदर्श कल्पनेच्या आधारानें आपण जगांतील घडामोडीचें, या सर्व पसार्याचें, मूल्यमापन, योग्यायोग्यत्व ठरवीत असतों. आपणांस प्रथम वस्तूचें दर्शन घडतें. नंतर त्या वस्तूचें मूल्यदर्शन आपणांस होतें. हें मूल्यदर्शन, परमात्मदर्शनाच्या आदर्श कल्पनेच्या आधारानेंच होत असतें. जगांतील वस्तूंचें मूल्यमापन करीत असतांना अस्पष्ट, अस्फुट अशी का होईना, परंतु कांही तरी आदर्शाची कल्पना अंतःकरणांत असतेच असते. आपण दोन माणसें पाहतों. एकापेक्षां दुसरा चांगला, अधिक श्रेष्ठ असें आपण म्हणतों. ज्या वेळेस असें आपण म्हणतों त्यावेळेस उत्कृष्ट मानवाचा एक आदर्श, श्रेष्ठ पुरुषाची एक ध्येयभूत कल्पना मनांत असतेच. एरव्हीं आपण हा मनुष्य त्याच्यापेक्षां बरा असें म्हणू शकणार नाहीं. आदर्शाचें ज्ञान असल्याखेरीज मूल्यमापन आपण करूं शकत नाहीं. वस्तुदर्शन, मूल्यदर्शन, आदर्शदर्शन अशा विविध वाटेने आपण सत्याचें ज्ञान करून घेत असतों. जी सृष्टि, जो समाज इंद्रियगम्य असतो, प्रत्यक्ष समोर ज्याचा अनुभव येतो त्याला आपण प्रत्यक्ष सृष्टि म्हणूं. ती सृष्टि जी आपल्या ध्येयांत असते, आपल्या कल्पनेंतील आदर्शांत असते तीं आपण परोक्षसृष्टि म्हणूं. दृष्टीच्या पलीकडची ती परोक्ष सृष्टि. आपण एखादें सुंदर फूल बघतों. आपणांस आनंद होतो. - परंतु त्यांत सौंदर्याची परिपूर्णता दिसत नाहीं. कांहींतरी कमी आहे असें वाटतें.