परंतु शेवटीं खरी सुधारणा व्हायची असेल तर अंतरंग सुधारूनच होईल. जुने लोक तीर्थांना जावें, व्रतेवैकल्यें करावीं, स्वर्गाचें फळ मिळेल, नरकांत जावें लागेल अशी लालूच वा भीति दाखवून सन्मार्गाकडे माणसाला वळवावें असें म्हणत. परंतु हें सर्व बाह्यांग झालें. हे बाह्य उपाचर होत. बाह्यांगानें कर्मठपणा वाढतो. त्या क्रिया दांभिक होतात. मनावर संस्कार होत नाहीं. बाह्य चिन्हांनीं आपण मन सुधारूं शकत नाहीं. ते शक्य नाहीं. म्हणून संतांनीं भक्तीचा मार्ग अंतःकरणशुध्दीसाठीं दिला. ज्ञानेश्वर म्हणतात, ''अंतःकरण सुधारण्याचा मार्ग पुढें आला म्हणजे मग प्रायश्चित्ताचे मार्ग निरुपयोगी ठरतात.'' नामयज्ञ, जपयज्ञ हाच खरा मार्ग. अंतःकरणशुध्दीचा ध्यास म्हणजे जपयज्ञ. प्रभूचें नांव अंतःकरणशुध्दीसाठीं घेणें. अंतःकरणशुध्दि ही खरी मूलगामी शुध्दिं, रोगाचें मूळच नष्ट करणारा हा खरा उपाय. ज्ञानेश्वर म्हणतात, ''कीर्तनाचेनि नटनाचें ! नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे'' प्रायश्चित्त द्यायचें कोणाला? सर्वांचीं अंतःकरणेंच शुध्द झालीं. ''नामाचि नाहीं पापाचें, ऐसें केलें'' पापाचें नांवच उरलें नाही. अंतरंगशुध्दि केल्यावर आतां प्रायश्चित्तांचे खटाटोप कशाला? आतां तीर्थे क्षेत्रें नकोत. ''तीर्थें ठायावरून उठविजी' असें ज्ञानेश्वर महाराज गर्जून सांगतात.

''यमु म्हणे कवणा यमावें
दमु म्हणे कवाणा दमावें''

यमनियम आतां नकोत. आतां कोणाचें दमन, कोणाचें नियमन? सारेच निर्मळ झालेले. ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणें बाह्य गोष्टींपेक्षां अंतरंगशुध्दीला महत्त्व देतात तीच दृष्टि आपण घ्यायला हवी. तुरुंग, कोर्टें, कायदे, पोलीस, लष्कर, सत्ता, शस्त्रें ह्या बाह्य साधनांनीं खरी न्यायबुध्दि समाजांत येणार नाहीं. जोंपर्यंत तुरुंग आहेत, कोर्टें आहेत तोपर्यंत समाजांत अन्याय आहे, पाप आहे, हाच त्याचा अर्थ. ते दडपून ठेवणें आहे एवढेंच. परंतु या असत् वृत्ति केव्हां मुंडी वर करतील त्याचा काय नेम? सत्याग्रही माणसाची नीति म्हणून अंतरंगशुध्दींतून जन्मत असते. आजारी पडतात, दवाखाने वाढवा; अन्याय होतात, पोलिस ठेवा, तुरुंग ठेवा. याचा काय अर्थ? दवाखाने काढावेच लागणार नाहींत असें करा. आरोग्यशास्त्र वाढवा. देहाचें आरोग्य नि मनाचें आरोग्य वाढवा. म्हणजेच दावखाने, तुरुंग यांचा खटाटोप पडणार नाहीं. आरोग्यशास्त्र इतकें वाढवायचें कीं कोणी आजारीच पडणार नाहीं; तद्वत् नीतिशास्त्र इतकें वाढवायचें, पापबुध्दि इतकी नष्ट करायची कीं कोणीं पापप्रवृत्तच होणार नाही. ज्या समाजांत देहाचें नि मनाचें आरोग्य नीट राहील असा मनानें नि शरीरानें निरोगी समाज आपणास निर्मायचा आहे. त्यासाठीं सत्याग्रह हा मार्ग आहे. सत्याग्रहव्रतधारी लोक समाजांत वाढवावयाचे. सत्ता नि संपत्ति यांच्यापासून दूर असणारे लोक समाजांत वाढवावयाचे. लोकसंग्रहार्थ म्हणूनहि यांनीं हिंसा करायची नाहीं, असत्य बोलायचें नाहीं. हिंसेनें लोकसंग्रह, लोककल्याण खरोखर होतच नाहीं. हाच मुळी सत्याग्रही मनुष्याचा ठाम सिध्दान्त असणार, अविचल निरपेक्ष निश्चय असणार. असे लोक जेव्हां समाजांत निपजतील वाढतील तेव्हां

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel