युध्दाचे वैफल्य
महात्माजींच्या मते महाभारत म्हणजे एक महान् शोकान्त काव्य आहे. युध्दाच्या मार्गाने येथे अखेर कोणाचेच हित झाले नाही. ज्यांनी जिंकले ते तरी सुखी झाले का? नाही. तेहि रडले. त्यांनीहि अश्रु ढाळले. ते भारती युध्द संपते आणि धर्मराजा सर्वांसह सर्व मृतांना, धारातीर्थी पडलेल्यांना पिंड द्यायला जातो. करुण असा तो प्रसंग आहे. सर्वांचे श्राध्द करायचे असते. धर्मराजाच्या मनांत काहूर माजते. तो कर्णाच्या नावांने पिंड द्यायला तयार होतो. हा आपला भाऊ, वडील भाऊ हे त्याला आजवर माहीत नव्हते. तो सद्गदित वाणीने माता कुंतीला म्हणतो ; ''आई, कर्ण हा आमचा वडील भाऊ हे आम्हांला आधीच कळते तर आम्ही युध्द केले नसते; मी तरी केले नसते.'' धर्मादिकांस हे कळूं नये याचा भावार्थ काय? भावार्थ एवढाच की, अन्यायाचे निवारण व्हायला हवे. अन्यायी मनुष्य भाऊ असला तरी त्याचेहि पारिपत्य व्हायला हवे. दुसरा मार्गच नसेल तर अपरिहार्य म्हणून हा हिंसामार्ग, युध्दाचा मार्ग अवलंबायचा. कठोर होऊन भावासहि शिक्षा करायची. समत्वबुध्दीने कर्तव्य म्हणून ते युध्द करायचे. हे सारे बरोबर आहे. परंतु सर्वच ठिकाणी हिंसा बरोबर असा याचा अर्थ नाही. परकीयांशी लढतांना अहिंसा आठवतच नाही. भावाला कसे मारूं मनांत येते. परंतु परक्यावर प्रहार करतांना मनास काही वाटत नाही. घरच्यांशी लढतांना हिंसा करूं की न करूं असा व्यामोह वाटला; परंतु असा सर्वांजवळ वागतांना कां वाटूं नये? तुमचा घरगुती नियम विश्वव्यापक करा. स्वकीयांशी जसे वागावे असे वाटते, तसेच परकीयांशीहि वर्तन ठेवा. अन्यायी परकी असो, स्वकीय असो, दोघांना मी मारणार; आणि तू 'अन्याय करणारा माझा आहे, मी त्याचे परिवर्तन करू पाहीन' असे म्हणशील तर परकीयांच्या बाबतींतहि तसेच म्हण. हिंसा स्वजनांच्या बाबतींत निंद्य असेल तर सर्वत्रच ती निंद्य आहे. सर्वत्र समत्वबुध्दी असूं दे. साधुत्वाची मूलभूत प्रेरणा सर्वांच्या अन्तर्यामी आहे. स्वकीयांच्या हृदयांतील सुप्त साधुता जागृत होईल अशी तर तुला आशा वाटेल तर परकीयांच्या बाबतींतहि असे का वाटूं नये? साधुत्वाच्या वृत्तीचा ईश्वराने कोणास कायमचा मक्ता दिलेला नाही. भलेबुरे सर्वत्र आहेत. महात्मा गांधींची मानवांतील मूलभूत सत्प्रेरणेवर श्रध्दा आहे. या श्रध्देवरच त्यांचे सारे दर्शन आधारलेले आहे. मुलांनी आत्मक्लेशाने आईबापांचे परिवर्तन केल्याची उदाहरणे आहेत. आईबाप चुकीचे सांगतील तर आम्ही ऐकणार नाही. त्यांची आज्ञा मोडूं आणि कष्टहाल सोसू असे भारतीय मुले, प्रल्हादासारखी सत्याग्रही बाळे सांगत आहेत. यतिधर्मात हा आत्मक्लेशाचा मार्ग होता; परंतु आपल्याकडील राजधर्मांत तो नव्हता. लोकमान्य गीतारहस्यांत म्हणतात, ''राजकारणांत असे वागून चालणार नाही. यतिधर्मांत हे सारे ठीक आहे.'' परंतु प्रजाधर्मांत, राजधर्मांत ज्याप्रमाणे राजकारण आहे, त्याप्रमाणे यतिधर्मांतहि आहे.
राजकारण आणि राजधर्म भिन्न
राजकारण आणि राजधर्म हे समानार्थक शब्द नाहीत. प्रजाधर्मांत राजकारण आहे, यतिधर्मांतहि आहे. राजधर्म राजापुरता; परंतु राजकारणाची व्याप्ति फार मोठी आहे. ही व्याप्ति लक्षांत घेऊन राजकारणांतील हिंसा दूर करायची असेल तर ती प्रथम यतिधर्मांतून जितकी निघेल, प्रजाधर्मांतून जितकी निघेल, तितकी राजधर्मांतून निघणार नाही. कारण राजधर्माला जणू सदर परवाना असे वाटत असते. हिंसा अपरिहार्य, आपला हक्क असे त्याला वाटत असते. राज्यसंस्था चालवणार्यांच्या हिंसा अंगवळणीच पडलेली असते. यतिधर्म, प्रजाधर्म असे नाही मानीत. यतिधर्मांत स्वसंरक्षणार्थंहि हिंसा नाही. यति स्वतःचे बलिदान करील. तो पुन्हा असंग्रही असतो. यति आपल्या उदाहरणाने, प्रखर प्रयत्नाने सर्व समाजाला पुढे नेऊ पाहतो, आपल्याबरोबर घेऊ पाहतो.