''तीर्थे ठायींची उठतील
कोणी तरी वैकुंठासि जावें
तों वैकुंठचि केलें आघवें''

वैकुंठास जा ही भाषाच नको. भूतलावरच देवाचें राज्य, तें वैकुंठ निर्माण केलें आहे. ही जी संतप्रवृत्ति, रामनामाच्या उपायानें, अंतःशुध्दि करण्याच्या उपायानें समाज सुधारण्याची ही जी संतप्रवृत्ति तीच महात्माजींच्या सत्याग्रही नीतींत आहे. महात्मा गांधींची विचारसरणी संतांच्या शिकवणीचाच विस्तार आहे. तींतूनच ती वाढत आलेली आहे. समाजाच्या अंतरंगाची सुधारणा व्हावी या गोष्टीवर गांधीजी भर देतात. समाजाची आंतरिक सुधारणा आधीं हवी. केवळ आर्थिक समता निर्मून किंवा केवळ कायद्याचें भय दाखवून खरी सुधारणा होणार नाहीं. समाजांत संपत्ति नि सत्ता यांचा मोह दूर ठेवून स्वेच्छेनें एक प्रकारची संन्यस्त वृत्ति धारण करून नैतिकशक्ति जागृत ठेवणारे लोक ज्या मानानें निघतील त्या मानानें समाज खरा सुखी होण्याचा संभव आहे. अंतरंगसुधारणा होत गेली तरच सत्ययुगाचा आरंभ सुरू झाला असें म्हणतां येईल. पूर्णता हें ध्येय आहे. सत्ययुगाच्या ध्येयाकडे जायचें आहे. त्या मार्गानें आपली पावलें पडत आहेत की नाहीं हें पहावें. याची कसोटी कोणती? आपल्या व्यवहारावरून आपलीं पावलें योग्य दिशेंने पडत आहेत की नाहीं हें पहावें. याची कसोटी कोणती? आपल्या व्यवहारावरून आपलीं पावलें योग्य दिशेनें पडत आहेत कीं नाहीं तें दिसून येईल. हिंदुस्थानांतील समाजाचें अंतःकरण सुधारत आहे कीं नाही याची परीक्षा पुढील गोष्टीवरून करावी. येथील राज्ययंत्रावरून ती परीक्षा करतां येईल. सरकारला व्यवस्था ठेवण्यासाठी लष्कर कमी लागतें की अधिक? पोलिसांवर खर्च वाढला आहे कीं कमी झाला? यावरून समाजांत न्यायबुध्दि वाढली आहे की नाहीं तें दिसेल. समाजांत, राज्यांत अन्याय अधिक असेल तर अधिक लष्कर ठेवावें लागेल. न्यायीपणा असेल तर कमी ठेवून भागेल. अन्याय समाजांत असेल तर अधिक तुरुंग लागतील. तुरुंगांत दोन प्रकारें भरती होते. समाजांत अन्याय असतो, समता नसते, बेकारी असते, दारिद्य्र असतें म्हणून कोणी परिस्थितींमुळें चोरी वगैरे करून तुरुंगात जातात. त्यांची संख्या अधिक झाली तरीहि समाज नि राज्यपध्दति सडलेली आहेत, असें समजायला हरकत नाहीं. आणि राज्यपध्दतीच्याविरुध्द कायदेभंग करणारे, न्याय स्थापला जावा म्हणून अहिंसक बंड करणारे तेहि तुरुंगात जातात. ज्या राज्यपध्दतींत अशा दोन्ही रीतींनी तुरुंग भरून जात असतात, ती नादान राज्यपध्दति होय. ब्रिटिश राजवट जी हिंदुस्थानांत आहे, ती या दृष्टीनें निकामी ठरते. परंतु काँग्रेसचे मंत्री मध्यन्तरी होते त्यांनीहि गोळीबार केले त्याचें काय? होय, त्यांनीहि गोळीबार केले. आदर्श रचनेच्या दृष्टीनें त्यांचा कारभार सदोषच ठरतो. परंतु ब्रिटिशांनीं जेथें शतपट केला असता तेथें काँग्रेसच्या कारकीर्दीत केवळ अपरिहार्य म्हणून करण्यांत आला. अगदीं जरूरच पडली म्हणून केला. शेवटीं आदर्श सृष्टि, आदर्श राज्यपध्दति दूरच राहणार. आपणांस तिच्याकडे जावयाचें आहे. देवाचें राज्य हृदयांत आहे. तें हजारों वर्षें झालीं तरी प्रत्यक्ष संसारांत अजून दाखल करतां येत नाहीं. तें ध्येय दूर असलें, परोक्ष असलें तरीहि तें जवळ आहे. अंतःश्चक्षूला तें दिसत असतें. कांहींना त्याचा जीवनांत अनुभव घेतां येतो. त्या आदर्श जीवनाचा, आदर्श ध्येयसृष्टीचा कोणाला कांहींच अनुभव नसता तर तो आदर्श आहे असें म्हणण्यांत तरी काय अर्थ होता? तें ध्येय दृष्टीस दिसत नसलें तरी अनुभवाला येतें. ही जी अनुभूति ती त्या आदर्श सृष्टीची सत्यता पटवीत असते. ही अनुभूति एका अर्थानें आपणांस अत्यंत जवळची आहे. डोळयांना होणारा आनंद, एखादी वस्तु प्रत्यक्ष दिसून होणारा आनंद हाहि जरा दूरचा म्हणतां येईल. परंतु ज्या गोष्टीची अंतःकरणांतच अनुभूति येते, ती जणूं जीवनाशीं एकरूप झालेली असते. तो अनुभव प्रत्यक्ष नाहीं, परोक्ष नाहीं. त्याला एक विशेष शब्द आहे. तो अपरोक्ष अनुभव असतो. इंद्रियातीत परंतु अनुभव असतो. अपरोक्षनुभूति असें तिला म्हणतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel