आम्हांला आमच्या गावांची व्यवस्था लावणें सोपें आहे. मँचेस्टरची सेवा आम्ही करणें कठीण. महात्मा गांधी म्हणतात कीं, संपत्तीचें विकेंद्रीकरण करून आर्थिक व्यवहारांतहि अहिंसा आपण दाखल करूं या. ही अहिंसावृत्ती दाखल करायची असेल तर पूर्वीच्या ग्रामसंस्था पुन्हा प्राणमय करायला हव्यात. ग्रामोद्योग सुरू केले पाहिजेत. मोठमोठया कारखान्यांतील मालाशी स्पर्धेत हा ग्रामोद्योगी माल टिकेल कसा? याचें उत्तर एवढेंच कीं, गावांतील माल घ्यायचा; बाहेरचा घ्यायचाच नाहीं. गावांतील मालांतहि सुधारणा करीत जायचें. सुधारणा करायची नाहीं असे नाही. मागें वस्तु निर्माण करीत होतों तशाच पुढें कराव्या असें नाहीं. शोधबोध करावे. सेवेची मर्यादा ओळखून जें क्षेत्र असेल तेथें बसून सुधारणा करून माल भरपूर वाढवा. गांवच्या वस्तूंचा खरा अभिमान असेल तर तिच्यातील दोष दूर करा. ती चांगली करा. सर्वधर्मसमभाव आपण म्हणतों म्हणजे काय? माझ्या धर्माचा मी अभिमान धरावा; त्याच्या धर्माचा त्यानें धरावा परंतु माझ्या धर्मांतील सर्वच गोष्टी चांगल्या असें मी नाहीं म्हणता कामा. अभिमान याचा अर्थ जे दोष असतील ते काढून गुणांची वृध्दि करणें. दोषांचा अभिमान धरायचा नसतो. अभिमान गुणांचा धरावयाचा. माझ्या धर्माचा मला अभिमान असेल तर मी त्यांत सुधारणा करीत जाणें हें माझें कर्तव्य आहे. गांवाची सुधारणा, कुटुंबाची सुधारणा, धर्माची सुधारणा अशीं अनेक कर्तव्यें असतात. माझ्या धर्माचा अभिमान म्हणजे दुसर्‍यांना माझ्या धर्मांत आणणें नव्हें. ज्या वातावरणांत मी राहिलों, मी वाढलों, तें मला प्रिय असतें. मी त्यांतील वाईट भाग काढला पाहिजे. माझ्या भोवतालची हवा मला शुध्द केली पाहिजे. सर्वधर्मसमभाव अशानें येईल. सारे धर्म शुध्द होत गेले म्हणजे त्यांच्यांत भांडण राहणार नाहीं.

अहिंसेनेंच जगांत खरा न्याय स्थापिला जाईल हा महात्मा गांधींचा सर्व जगाला संदेश आहे. अहिंसावृत्ति पाळली जाण्याची आज तरी कितीशी आशा आहे? महात्माजी म्हणतील कीं, मी माझ्यापरी खटपट करीत आहें. लोकांना सांगत आहें. महात्माजी हेहि क्रान्तिकारकच आहेत. ते मुख्यतः सामाजिक क्रान्तिकारक आहेत. परंतु राजकारणाच्या अडचणी येतात म्हणून ते राजकीय क्रान्तिकारकही आहेत. अहिंसा, सत्य यांना सोडून व्यवहार सुरू होतात तेव्हा पुन्हा पुन्हा सत्य-अहिंसेवर अधिकाधिक जोर देणार्‍या व्यक्ति येतच असतात. पूर्वीचे विधिनिषेध आज अपुरे आहेत. एका वेळचे विधिनिषेध दुसर्‍या वेळेस उपयोगी पडतीलच असें नाहीं. आज आपण पुढें गेलें पाहिजें. सत्यपालन करतांना, अहिंसा पाळतांना दुसर्‍यास त्रास देऊं नका असें सांगण्यांत येतें. परंतु विचार केला तर दुसर्‍यास त्रास होतोच. एक प्रकारची अहिंस्रेने आपण सक्ति करीत असतों. माझा मुलगा दुराचारी आहे असें दिसलें तर मी त्याला आधार देणार नाहीं, त्याच्याशी असहकार करीन असें महात्मा गांधी म्हणतील. त्या परिस्थितींत मृत्युहि आला तरी सहकार करणार नाहीं. त्याचा परिणाम मृत्यूंत होईल अशी कांही आधीं कल्पना नसते. हिंसा करावी, मरण यावें हा उद्देश नाहीं. तो सुधारावा हा हेतु. निदान माझ्याकडून तरी जें मला पाप वाटतें त्याच्याशी सहकार होतां कामा नये, त्या पापाला मदत मीं करतां कामा नये. जे असत् व्यवहार करतात त्यांना असत् व्यवहार करून उपजीविका मिळविण्याची संवय जडलेली असते. ही संवय ते सोडीत नाहींत. अशा असत्य व्यवहार करणार्‍यांशी मीं जर असहकार केला तर त्यांना त्रास होतो ही गोष्ट खरी. आपण असा त्रास त्यांना होईल हें गृहीत धरूनच असहकार करतों. त्रास द्यावा हा हेतु नसतो. परंतु परिणाम तसा होतो. समजा, आपण स्वदेशी धर्म आचरूं लागलों तर इंग्लंडमध्यें थोडी बेकारी होईल. परंतु त्याला इलाज काय? इंग्लंडमधील लोकांनी निराळी राहाणी स्वीकारावी. हिंदुस्थानांतील धंदे बुडवून त्यांनी सुखांत रहावें ही हिंसा आहे. जगांतील क्लेश दूर करण्याचे दोन मार्ग आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel