आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ
मग संतोषविजे कुळ । आपुले जे
अर्जुन क्षत्रियत्व विसरला नव्हता. जगांतील राजे महाराजे जिंकावे. जगाचे राज्य मिळवून आपल्या कुळाचा गौरव वाढवावा. आपल्या देशाचे, राष्ट्राचे वैभव इतरांना निर्दाळून वाढवावे ही पूर्वजांची प्रथ तो जाणतो परंतु जगाला जिंकून ज्यांचा गौरव वाढवावयाचा, त्यांनाच आज कसे मारायचे? त्या आप्तांना, आपल्याच कुळांतील बंधूंना कसे मारायचे हा प्रश्न अर्जुनाला पडतो. ज्या कुळाच्या मोठेपणासाठी इतरांना जिंकायचे त्या माझ्या कुळांतल्यांना कसे मारू असे अर्जुन मोठया विषण्णतेने विचारतो.
''ऐसेयाते कैसेनि मारूं । कवणावरी शस्त्र धरूं
निजहृदया करूं । घातु केवी''
अर्जुनासमोर युध्द करावे की न करावे असा प्रश्न नाही. इतरांशी लढावे, स्वकीयांशी लढू नये ही गोष्ट अर्जुन जाणतो. या स्वकीयांशी, गुरुजनांशी कसे लढू हा त्याचा प्रश्न आहे. मी युध्द करणार नाही, मी रानावनांत जातो असे अर्जुन म्हणतो परंतु श्रीकृष्णांनी त्याच्या विचारांतील चूक दाखवून, त्याच्या प्रश्नांतील चूक दाखवून त्याला युध्दप्रवृत्त केले आहे. अर्जुन म्हणतो, ''मला नको हे राज्य. या राज्य-सुखाची मला वासना नाही. माझे राज्य, माझा हिस्सा यांनी घेतला तरी चालेल. ''अशा युध्दनिवृत्त अर्जुनाला श्रीकृष्णांनी का प्रवृत्त केले? कारण अर्जुनाचा आता तो वैयक्तिक प्रश्न राहिला नव्हता. अर्जुनाच्या पलीकडे जाऊ तेव्हाच त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. ज्यावेळेस कौरवांचे व पांडवांचे युध्द पुकारले गेले त्यावेळेस कौरव कौरव म्हणून नव्हते. पांडव पांडव म्हणून नव्हते. कौरव म्हणजे अन्यायाचे प्रतीक व पांडव म्हणजे न्यायाचे प्रतीक अशी ती परिस्थिति होती. एका बाजूस न्याय व एका बाजूस अन्याय असा तो प्रकार होता. अर्जुनाने पांडवांसाठी म्हणून लढावयाचे नव्हते. तर न्यायासाठी त्याने लढावयाचे होते. ही कर्तव्यनिष्ठा त्याने सोडणे धर्म्य नव्हते. जर तो ती गोष्ट टाळू पाहील तर अन्यायाचे पारिपत्य कसे व्हायचे? अन्यायाचे पारिपत्य झालेच पाहिजे. न्यायासाठी लढण्याची निष्ठाच जर जगांतून नष्ट होईल तर या जगांत अन्यायी लोकांचे राज्य होईल. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकावतो. मला राज्य नको असे म्हणून प्रश्न सुटत नाही. एखाद्याने माझ्यावर अन्याय केला तर मी स्वस्थ बसलो समजा. परंतु तो उन्मत्त मनुष्य मग दुस-यावर अन्याय करील. तो दुस-यांची हिंसा करील. एखादा पिसाळलेला कुत्रा आता माझ्यावर आला. मी म्हटले की चावू दे मला. परंतु तेवढयाने इतरांचा प्रश्न सुटत नाही. अन्यायाचे निवारण करण्याचे साधन समाजापुढे सदैव हवे. अन्याय सहन करा असे म्हणणे म्हणजे अन्याय आहे. महात्मा गांधींची ही अशी दृष्टि आहे. ते राजकारणांत या दृष्टीने पडले आहेत. स्वतःच्या मोक्षासाठी व जगाच्या मोक्षासाठी, अन्याय दूर करण्यासाठी, लढणे त्यांना कर्तव्य वाटते.