ज्या दिशीं भेट तुझी ग उदित मन विषयानंदें भ्रमी ।
एकांतीं चाल रतूं, सुदिन आज सण शिमगा पंचमी ॥धृ०॥
मुलायम शरिर तुझें, जैसें भरजरि पैठणचा झुणा ।
पाहुं दे दुष्टिभरि तुझा मुखचंद्रवदन देखणा ।
वाकडी जाउं नको, तुला गडे जिव देतों आंदणा ।
श्रृंगार कानीं बुगडया, वाकि, वाकडया ।
हुर्मोजी नथेला टीक, हिरकणी, हंलकडया ।
राखडी, केतक, केवडया, जडित लालडया ।
मंजुळ वाजती पदीं जोडवीं, तोरडया ।
निर्मळ सुवास लुगडया, शालेच्या घडया ।
ठेविसी बासनामधें कस्तुरिच्या पुडया ।
विपुल धनद्रव्य घरीं, ईश्वरें काहिं न केलें कमी ॥१॥
प्रीतीची तूं आमच्या, ह्रदयवासिनी जिवाची सखी ।
सणाचे आज तुझ्या वाटतें मुख लावावें मुखीं ।
अशामधें करुं मौजा, आपले प्राण उभयतां सुखी ।
आज ह्रदयसंपुटीं मारुंदे मिठी ।
अपूर्व सुशिल, सुंदर मुद्रा गोमटी ।
बोलणार शहाणी मोठी, भाषणें मिठीं ।
गौरवर्ण कंबर, जणुं सिंहाची कटी ।
कुंकम सुगंध मळवटीं, कोर धाकटी ।
पीतवर्ण हाताला अर्गजांची उटी ।
दिवसगत लाउं नको, देतसों घरदारांची हमी ॥२॥
धरितसों पाय तुझे, नको गडे अभिमानानें बुडूं ।
लागलिस गोड अधीं, शेवटीं कां ग असावें कडू ? ।
होतसें स्मरण तेव्हां ढळ ढळ ढळ येतसे रडूं ।
रूप दिसे जशि इंदिरा सगुण ही शिरा ।
अशि नाहिं कोठें कोणीच पाहिली तर्‍हा ।
भोगितां हलेना जरा, लवे करकरा ।
चुंबितां वदन तें पयघृतमधुशर्करा ।
लागला तुझा हुरहुरा, हेत कर पुरा ।
पेटला मदन, जशि आग लागे कर्पुरा ।
विषय चैतन्य करी, जातसे प्राण, होतों गडे श्रमी ॥३॥
भोगुन तृप्त करी, वियोगें विष कां गे वाढिसी ? ।
राहिलीस दुर कशी ? जशि हरणी चुकलि पाडसी ।
देउन विश्वास आतां उशाची कां मांडी काढिशी ? ।
गडे तानभुक लागेना, झोंप येइना ।
होतात कठिण या दु:खाच्या वेदना ।
क्षणभरि कोठें करमेना आमच्या मना ।
तुजविशी लागल्या जैशा यमयातना ।
अवताररुपी तूं कांता मनमोहना ।
वर्णितां धन्य जाहलों, पुरल्या वासना ।
होनाजी बाळा म्हणे, सुंदरा ही केवळ अनुपमी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel