''हे देवाचं जिवंत काव्य आहे,'' मी म्हटले.
''श्याम, तुझ्या काही कविता तू बरोबर आणल्या आहेस का? सखारामने प्रश्न केला.
''का बरं? मी सचिंत होऊन विचारले.
''त्यातील काही निवडक कविता महाराजांना दाखवू. महाराज प्रत्यही पहाटे डोंगरावरील यमाईस जातात. ते डोंगर उतरताच त्यांच्या हातांत आपण देऊ,'' सखाराम म्हणाला.
''कोणत्या हेतूने?'' मी म्हटले.
'' त्यांना आवडल्या तर ते उत्तेजन देतील. महाराज स्वत: कीर्तन रचतात. गुणी मनुष्य गुण ओळखतो. तुझा पुढचा मार्ग सुकर होईल. अडचणी जातील,'' तो म्हणाला.
''परंतु मी गरीब आहे, मला इथल्या बोर्डिंगमधून शिदोरी मिळावी, असा अर्ज केला, तर नाही का काम होणार?'' मी विचारले.
''श्याम, आज तू एकदम आलास; परंतु इथे एक नवीन नियम झालाय. त्यामुळे मोठी चिंता उत्पन्न झाली आहे,'' तो म्हणाला.
''कोणता नियम?'' मी खेदाने म्हटले.
''संस्थानबाहेरच्या मुलांना अत:पर बोर्डिंग बंद करण्यात आलं आहे. ह्या वर्षापासून हा नियम अंमलात येणार आहे. त्यामुळे तुझ्या अर्जाचा विचार होणार नाही,'' सखारामने सांगितले.
मी काही बोललो नाही. मी गंभीर झालो की, मध्येच कोठे तरी शून्य दृष्टीने बघे, पुन्हा खाली पाही. माझ्या डोळयांसमोर एक प्रकारचा अंधार दिसू लागला. उद्यापासून कोठे जेवायचे हा प्रश्न होता. अन्नब्रह्माशिवाय मी जगणार कसा? ब्रह्माच्या अनंत व्याख्या आहेत; परंतु अन्नब्रह्माइतकी हरघडी अनुभवास येणारी दुसरी कोणती व्याखा आहे? सारी चराचर दुनिया ह्या ब्रह्माची नि:सीम उपासक आहे.
''श्याम, बोलत का नाहीस?'' सखारामने विचारले.
''काय बोलू सखाराम?'' मी कष्टाने म्हटले.
''मला मिळणारी शिदोरी आपण दोघे मिळून खाऊ,'' मो म्हणाला.
''परंतु असं किती दिवस चालणार? माझ्यासाठी तू का नेहमी उपाशी राहाणार? दोन भाकरी व दोन मुदा एवढं अन्न मिळणार!आपलं दोघाचं तेवढयाच कसं भागणार? मी म्हटले.
''कविता दाखवायच्या ना? त्याने पुन्हा विचारले.
''नको,'' मी म्हटले.
''का बरं?'' त्याने विचारले.
''मला ते आवडत नाही. माझा भिडस्त स्वभाव आहे,'' मी म्हटले.
''भीड भिकेची बहीण. जगात लाजून भागत नसतं,'' सखाराम म्हणाला.
''कार्यपरें सर्वथा न लाजावें' असा मोरोपतांचा एक चरण आहे आणि तुकोबांच्या एका अभंगात आहे, 'मेली लाज। धीट केलो देवा॥ लाज मेली, म्हणजेच मनुष्य धीट होतो,'' मी म्हटले.
''तू कवितेतले चरण म्हणून दाखवतोस; परंतु प्रत्यक्ष काय करणार आहेतस? पोपटपंची काय कामाची?'' व्यवहारी सखाराम म्हणाला.
''मला त्याप्रमाणे वागण्यांचे धैर्य नाही, हे खरं आहे. माझ्या कविता महाराजांना दाखवाव्या, असं मला काही वाटत नाही आणि खरं सांगू का सखाराम? अरे, मी मुलांमधला कवी आहे. तुम्ही माझे मित्र, म्हणून माझं कौतुक करता; परंतु पोक्त मंडळी, विद्वान मंडळी माझ्या कवितांना हसतील. ते हसणं मला कसं सहन होईल? माझ्या वेडयावाकडया कविता माझ्या ट्रंकेतच असू देत. माझ्या हृदयात, माझ्या ओठातच असू देत,'' मी म्हटले.
''श्याम, तू वेडाच आहेस, अशाने जगात पुढे कसा येशील? सखाराम म्हणाला.
''कोण एवढा उतावीळ झाला आहे जगाच्या पुढे यायला? मी कोप-यात कोकिळेप्रमाणे बसेन नि 'कुऽऊ' करीन,'' मी म्हटले.
''कोकिळेला सारं जग धुंडीत येईल,'' तो म्हणाला.
''परंतु कोकिळा दिसणार नाही. माणसाची व्यवहारी चाहूल लागताच ती उडून जाईल, गर्द झाडीत लपून बसेल,'' मी म्हटले.
''चल परत फिरु. काळोख पडत चालला,'' सखाराम म्हणाला.
''इकडे साप असतात का रे? कोकणात रात्रीच्या थंड वेळी धुळीवर येऊन बसतात,'' मी म्हटले.
''देशावर साप कमी आहेत,'' सखाराम म्हणाला.
आम्ही दोघे खोलीवर आलो.
माझ्याजवळ काही फराळाचे होते, ते आम्ही दोघांनी खाल्ले. रात्री अंथरुणे पसरुन आम्ही निजलो. मला वा-यावर निजण्याची सवय; परंतु येथे त्या खोलीत आम्ही सारे मुशाफर पडलो होतो. वारा बिलकूल नव्हता. जीव गुदमरत होता. मला झोप येईना. मी विचार करीत होतो. माझे कसे होणार, ह्याचा मी विचार करीत होतो. घरी परत जाण्याचा विचार मनाला शिवत नव्हता.मी उपाशी मरेन; परंतु परत जाणार नाही, असे मी स्वत:शी ठरवीत होतो. माधुकरी मागावी का, वार लावावे का वगैरे विचार मनात येत होते; परंतु येथे ना कोणी ओळखीचा, ना कोणी प्रेमाचा. कोठे तोंड उघडायचे? कोणापुढे शब्द टाकायचा? 'त्वमेव मात च पिता त्वमेव। त्वमेव बंधु:च सखा त्वमेव॥ असे मी मनात म्हणू लागलो. मला रडू आले. माझ्या रडण्याने मुले जागी होतील, अशी मला भीती वाटू लागली. रडत रडत व दुस-या दिवसाची काळजी करीत करीत, एकदाची केव्हातरी मला झोप लागली.