'' हिंगण्याला, कर्व्यांच्या संस्थेत,'' ते म्हणाले.
'' हिंगण्याला?'' मी आश्चर्याने विचारले.
'' हो का? तुम्हांला आश्चर्यास वाटलं?'' त्यांनी विचारले.
'' माझी मावशी तिथे आहे,'' मी म्हटले.
'' काय नाव?'' त्यांनी विचारले.
'' सखूबाई,'' मी सांगितले.
'' हो, माहीत आहेत त्या मला संस्थेत त्या शिकल्या,'' ते म्हणाले. आपण का त्या संस्थेत शिकवंता?'' मी विचारले.
'' नाही, मी प्रचारक आहे. मदत गोळा करून आणतो,'' ते म्हणाले. थोडया वेळाने त्यांनी मला विचारले,
'' मॅट्रिक झाल्यावर काय करणार?''
''मला एम् ए. व्हायचंच,'' मी म्हटले.
'' एम्. ए. होऊन काय करणार?'' पुन्हा त्यांचा प्रश्न आला.
'' आपल्या संस्थेसारखा एखादया संस्थेत काम करीन,'' मी म्हटले.
'' अवश्य या. आम्ही तुमचं स्वागतच करू! '' ते आनंदाने म्हणाले.
त्यांनी आम्ही सर्वाना फराळाने वगैरे दिले. डाळिंब, पेरू वगैरे फळे दिली. त्यांचा स्वभाव मोठा गोड व मनमिळाऊ वाटला.
'' तुमच्या मावशीला काही निरोप?'' त्यांनी विचारले.
'' मी कोकणात गेलो सांगा,'' मी म्हटले.
पुण्याच्या स्टेशनवर आम्ही सारे उतरलो, सखाराम व मी लगेच मुंबईला, जाणार होतो. गोविंदा व त्याचा धाकटा भाऊ बंडू पुणे शहरात जाणार होते. गोविंदाची पुन्हा औंधला भेट होईल, असे मनात म्हणत होतो. आमचा निरोप घेऊन ते दोघे भाऊ गेले. आम्ही मुंबईच्या गाडीत बसलो. मुंबईला पोचल्यावर बोटीने कोकणात गेलो. पुन्हा आईजवळ गेलो