''श्याम, अनारसे काय घेऊन आलास? उद्या भातही घेऊन येशील! तू वेडा आहेस अगदी. लोक तुला हसतात हो श्याम,'' राम म्हणाला.
''लोक हसू देत. माझा राम नाही ना हसत?'' मी विचारले.
''श्याम, प्रेमाचा हा बाहय पसारा कशाला? प्रेमाचं प्रदर्शन मला आवडत नाही. प्रेम हे मनोमनं असावं. आई एक ओवी म्हणते, ती मला फार आवडते,'' राम थांबला.
''म्हण ना ती ओवी. बायकांच्या काही काही ओव्या माणिक-मोत्यांप्रमाणे अमोल असतात. म्हण राम,'' मी म्हटले.
तुझा माझा मैत्रपणा! जगजाहीर नसावा॥लोभ अंतरी असावा। श्यामराया॥
रामने शेवटी माझे नाव घालून ओवी म्हणून दाखवली.
''राम, तू एक ओवी म्हटलीस, तर मी दोन म्हणून दाखवतो. ऐक.
आपण मैत्रिणी। मैत्रीला काय देऊ?॥
एक लवंग दोघी खाऊ। शांताताई॥
आपण मैत्रिणी। मैत्रीला काय देऊ?॥
एका घोटे पाणी पिऊ। शांताताई॥
राम, प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी का तुला मी हे देतो? मला प्रदर्शनच करायचं असतं, तर सर्वांच्या देखत मी हे दिलं असंत; परंतु कुणी जवळ नाही, हे पाहूनच मी देतो ना? केवळ माझ्या मनाच्या समाधानासाठी मी देतो; प्रेम हे आत मावेनासं झालं, म्हणजे ते बाहेर प्रगट होण्यासाठी धडपडत असतं; ते कृतिरूप होऊ पाहात असतं, असं नाही तुला वाटत? आणि हे बघ, तुला जर असं करणं आवडत नसेल, तर मी करणार नाही. शेवटी तुझा आनंद, तोच माझा आनंद. मला स्वतंत्र आनंद नाही,'' असे म्हणून मी गहिवरून उठून गेलो.
ज्या प्रेमाचा प्रत्यक्ष सृष्टीत साक्षात्कार होत नाही, ते प्रेम कसे समाधान देणार? अमूर्त प्रेम कोणाचे समाधान करील? देशभक्ताची देशभक्ती प्रत्यक्ष सेवेत प्रगट होईल, तेव्हाच ना तिला अर्थ प्राप्त होईल? परंतु कोणी म्हणेल, की प्रेम सेवेत प्रगट होऊ दे. पण सेवा म्हणजे तरी काय? आपल्याजवळ जे असेल ते देणे, म्हणजेच सेवा. रामची सेवा करता यावी, म्हणून का त्याने आजारीच पडले पाहिजे? म्हणून का त्याने सकंटातच पडले पाहिजे? प्रेमाची आपत्काळीच आवश्यकता, एरव्ही नाही का? प्रेमाची सदैव आवश्यकता आहे. ते सदैव सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे प्रगट होत राहिले पाहिजे. जे फूल सुगंध देत नाही, जी नदी ओलावा देत नाही, जी सतार संगीत स्त्रवत नाही, त्यांचा काय उपयोग? प्रेम सदैव देत असते. देण्यासाठी ते अधीर असते. ते न दिले तर पोटाला कळा लागतात!
राम एक प्रकारे निर्गुणोपासक होता. श्याम सगुणोपासक होता. रामला निराकर प्रेम-परमेश्वर पाहिजे होता. श्यामला साकार प्रेम-देव पाहिजे होता; परंतु देण्या-घेण्याचे प्रेम, हे शेवटी स्थूलच समजले पाहिजे. चैतन्यमय आत्म्याला चिन्मय प्रेमाचीच भूक असणार. अतींद्रिय प्रेमाचीच तहान असणार. एखाद्या वेलीचे सत्व आपण गाळून, अत्यंत शुध्द करून, घेऊ लागलो, तर शेवटी कदाचित शून्यच हाती लागणार! आणि अत्यंत निर्मळ ब्रह्माचे ......शून्य हेच यथार्थ वर्णन आहे. बाहय आकार आल्याबरोबर थोडी तरी मलिनता ही राहाणारच राहाणार!
रामची बहीण मालण एकाएकी आजारी पडली. तो विषमज्वरच होता. शुश्रूषा करण्याचे शास्त्रीय ज्ञान रामच्या आईच्या देखरेखीखाली मला त्या वेळेस मिळाले. बेडपॅन वगैरे वस्तू तोपर्यंत मी पाहिल्या नव्हत्या. बर्फाची पिशवी पाहिली नव्हती.