'' तरवारीपेक्षा लेखणी महत्वाची आहे. लेखणी आज्ञा करील, तिकडे तुम्ही तरवारी घेऊन जाल. तरवार स्वत: निरूपयोगी आहे. विचार हा तरवारीपेक्षा थोर आहे,'' मी म्हटले. राग मावळून, आमचे असे प्रेमाचे बोलणे-चालणे सुरु झाले. त्या शिपायांनी मलाही निजायला जागा दिली. मी जागा झालो, तेव्हा ते शिपाई डब्यात नव्हते. ते कोठे उतरले, कळले नाही. द्रुपदीच्या आईच्या मुलाची मला आठवण झाली. त्या शिपायात तर तो नसेल? तो असेल त्यातला म्हणूनच तर त्याने मला सहानुभूती दाखवली. मी त्याचे नाव, गाव विचारले नाही, म्हणून मला वाईट वाटले. मी पुन्हा झोपलो, तो रहिमतपूर स्टेशनवरच जागा झालो.

एक बैलगाडी करुन मी औंधला आलो, शाळा सुरु होती. मी निमूटपणे माझ्या खोलीत गेलो.
''श्याम, आलाससा ?'' द्रुपदीच्या आईने विचारले.
''पुण्याला जमेना,'' मी खिन्नपणे म्हटले.
''इथेच राहा. कशाला कुठे जातोस?'' ती म्हणाली.

मी खोली झाडली. घोंगडी पसरली. विहिरीचे पाणी आणले. हातपाय धुतले. मी झोपी गेलो.

शाळा सुटल्यावर सखाराम, एकनाथ, मुजावर सारे माझ्या खोलीत आले. मी थोडक्यात सारे सांगितले.

''श्याम, काही हरकत नाही. वाईट नको वाटून घेऊ.'' एकनाथ म्हणाला.
'' आम्ही तुला होईल ती मदत करु,'' मुजावर म्हणाला.
''बाकी श्याम, तू बावळटच त्या लफंग्याजवळ पैसे कसे दिलेस?'' सखारामाने विचारले.
''मला काय आधी माहीत, मो लफंग्या आहे म्हणून?'' मी म्हटले.
''ह्या कलियुगात जगायला तुझ्यासारखे लोक नालायक आहेत,'' तो म्हणाला.
''ह्या कलियुगातच माधव, अहमद, राम, मुजावर, तू, गोविंदा, एकनाथ मला मिळत आहेत. ह्या कलियुगातच आजीबाई भेटली. कलियुगाला नावं नको ठेवू, इतर युगांइतकंच कलियुग पवित्र आहे,'' मी म्हटले.
''श्याम, आज आमच्याबरोबर भाकरी खायला ये. मी एक भाकरी जास्त भाजतो,'' एकनाथ म्हणाला.

मित्र गेले. एकनाथ फारच सुंदर भाकरी भाजी. एकनाथ व वामन दोघे भाऊ. दोघे माझ्याच वर्गात होते. दोघे हाताने स्वयंपाक करीत. रहिमतपूर स्टेशनच्या जवळच त्यांचे गाव होते. मी एकनाथकडे गेलो. बेसन-भाकरी खाल्ली.

''श्याम, तू रोज आमच्याकडे जेवायला येत जा ना,'' एकनाथ म्हणाला.
''मागून वडील आले होते, त्यांना आम्ही विचारले होते,'' वामन म्हणाला.
''एकनाथ, एखादे वेळेस येत जाईन,'' मी म्हटले.
''पण संकोच कसला? तुझी एक भाकरी टाकीत जाऊ,'' एकनाथ म्हणाला.
''मी विचार करीन,'' मी म्हटले.
''ह्यात विचार कसला करायचा? ठरलं हं, श्याम,''एकनाथ म्हणाला.
मी उठून गेलो. इतक्यात दाजीबांनी हाक मारली.

''श्याम, बस. सतार ऐक. आज तुझ्या आवडीचं घाईघाईचं वाजवतो दाजीबा म्हणाले.
मी तेथे बसलो. दाजीबा सतार छेडू लागले. माझे मन प्रसन्न करण्यासाठी का दाजीबा वाजवीत होते? त्या दिवशीचे ते सतारवादन मी कधीही विसरणार नाही.

रात्र बरीच झाली. मी खोलीत आलो. पुन्हा औंधची यात्रा सुरु झाली. अंथरुण घातले व झोपी गेलो झोपेत एकनाथ माझ्या स्वप्नात आला.
'' श्याम, ये बरं का. तुला ओढून नेईन,'' असे तो माझा हात धरुन म्हणत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel