शाळामाउलीच्या मांडीवर
मी ज्या खोलीत राहात होतो, ती फारच कोंदट होती. मी तेथे आजारी कसा पडलो नाही, याचेच मला आश्चर्य वाटते. सूर्याचे किरण माझ्या खोलीत क्कचितच येत असत. खोलीत खूप डास होते. डासांचे माहेरघरच जणू तेथे होते. डोक्यावरून पांघरून घेऊन निजण्याची मला मुळीच सवय नव्हती. डोक्यावरून पांघरून घेताच मला गुदमरून गेल्याप्रमाणे होई. डासांच्या त्रासामुळै झोप येत नसे. मग मी रात्रीचा लिहित-वाचीत बसे. पहाटेच्या सुमारास झोपत असे, त्या वेळेस डासही जरा झोपी जात.
पुढे माझ्या खोलीत ढेकूणही मनस्वी झाले. पिसव्याही झाल्या. ढेकूण, पिसवा व डास ह्या तिघांच्या मा-यामुळे मी अगदी रडकुडीस आलो. आठ आण्यात चांगली खोली कोठे मिळणार? रात्री झोप यायची नाही. त्यामुळे वर्गात मला डुलकी येई. वर्गात मी कधीच झोपत नसे. वर्गात पुष्कळ मुले झोपा काढीत. विशेषत: पाठीमागच्या बाकांवर हे झोपाळू विदयार्थी बसत. आम्हांला इतिहास शिकविणारे जे मास्तर होते, त्यांना बरेच कमी दिसे. वाचून वाचून त्यांची दृष्टी मंद झाली होती. ते सुंदर शिकवित. ते इंग्रजी सुंदर बोलत. मला त्यांचे इंग्रजी आवडे. मी भराभरा त्यांची वाक्ये टिपून घेत असे. एकदा ते अकबराचे वर्णन करीत होते. त्यांनी इतकी विविध विशेषणे त्या वेळेस योजली, की मला आश्चर्य वाटले. ती विशेषणे त्यांना भराभर सुचली कशी, इंग्रजी शब्द भराभर सुचले कसे? मला त्यांचा तास फार आवडे. परंतु त्यांच्या तासाला पुढच्या बाकावरील मुले फक्त जागी असत. बाकी मुले झोपी जात. कधीही झोपी न जाणारा जो, मी, त्या मलाही क्वचित डुलकी येऊ लागली. एकदा कोणत्या तरी तासाला अशीच मला जरा झोप लागली! मुले हसत होती व मास्तर माझ्याकडे मधून मधून बघत होते.
'' अहो, त्यांना जरा जागे करा,'' मास्तर म्हणाले.
शेजारच्या विद्यार्थ्याने मला हलवून जागे केले. मी लाजलो, शरमलो. मुले मोठयाने हसली. नेहमी झोपा काढणा-या त्या मुलांना मला हसायची वास्तविक जरूर नव्हती.
'' तुम्ही काही वेळ उभे राहा, म्हणजे झापड उडेल,'' मास्तर म्हणाले.
मी उभा राहिलो. मला रडू आले. मास्तरांनी मला शिक्षा करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. आपल्या तासाला मुले का झोपतात? एक तर आपने शिकवणे मुलांना समजत नसेल, किंवा त्यांना ते आवडत नसेल अथवा मुलांना घरी खूप काम असल्यामुळे ती दमली असतील, अथवा रात्री त्यांना झोप आली नसेल अथवा जेवली नसल्यामुळे त्यांना थकवा आला असेल अथवा पुष्कळ व्यायाम केल्यामुळे त्यांना झोप लागली असेल, अथवा ह्या निर्जिव बौध्दिक शिक्षणाकडे त्यांचा मनाचा कल नसेल, अथवा ह्या उष्ण देशात दुपारी थोडी वामकुक्षी निसर्गत:च आवश्यक असेल परंतु ह्या बहुविध कारणांचा कोण शोधबोध घेणार? मुलांच्या घरच्या परिस्थितीचे ज्ञान किती मास्तरांना असते? ते इतिहास शिकवितात परंतु समोरच्या जिवंत मुलांचा इतिहास त्यांना अज्ञात असतो. ते अर्थशास्त्र शिकवतात;परंतु समोरच्या मुलांची आर्थिक स्थिती त्यांना माहीत नसते. आपण एकमेकांच्या जीवनात शिरतच नाही. मुलांच्या जीवनात शिरल्याशिवाय काय माती शिकविता येणार?
मधल्या सुट्टीत गोंविंदा म्हणाला,'' श्याम, आज तुलासुध्दा वर्गात झोप लागली?''
'' अरे, रात्री झोप येत नाही. ढेकूण, डास,पिसवा यांनी सध्या माझ्या खोलीचा कबजा घेतला आहे,'' मी म्हटले.
'' आमच्याही खोलित तीच स्थिती आहे. श्याम, माझ्या मनात एक विचार आला आहे., तुला सांगू?'' गोविंदाने विचारले. '' सांग,'' मी म्हटले. ''आपण शाळेतच झोपायला आलो तर?'' तो म्हणाला. '' ते कसं काय जमणार?'' मी कुतूहलाने विचारले.