''अरे मला काय माहीत, की कुणी नेईल म्हणून,'' मी म्हटले.
''तुला पुष्कळ गोष्टी माहीत होतील देशावर काटे असतात. देशावर चिखलात माणसं रुततात. देशावर चोरही असतात. सारं अनुभवाने शिकावं लागेल,'' तो म्हणाला.
''मी दाराला नुसती कडी लावून आलो आहे, ''मी म्हटले.
''मग उरलेले पैसेही जातील. उगीच जवळ अडगळ कशाला?'' सखाराम उपहासाने म्हणाला.
''परंतु गरीब, अडाणी माणसं चोरणार नाही,'' मी म्हटले.
''मग उरलेले पैसेही जातील. उगीच जवळ अडगळ कशाला? सखाराम उपहासाने म्हणाला.
''परंतु गरीब, अडाणी माणसं चोरणार नाहीत,'' मी म्हटले.
''पोट सर्वाना चोरी करायला लावतं,'' सखाराम म्हणाला.
''जगावर विश्वास शक्यतो टाकावा,'' मी म्हटले.
''टाका विश्वास. जग तुमचा गळा कापील. मग बसा बाेंबा मारीत,'' तो म्हणाला.
''गळा कापल्यावर बोंब तरी कशी मारु?'' मी हसत म्हटले.
''घे आणखी एक आंबा.'' सखाराम म्हणाला.
''पुरे,'' मी म्हटले.
''मी एकदा सांगेन. आग्रह करणार नाही. संकोच किती दिवस राखायचा? तो म्हणाला.
मी आणखी एक आंबा घेतला. शेवटी आम्ही हात धुतले. तो शेजारी संगीत ऐकू आले. कोणीतरी सतार वाजवीत होते. संगीताने मी वेडा होतो. मला त्यातले शास्त्र समजत नाही; परंतु माझे ह्दय खाली-वर होत होतो. संगीत म्हणजे खरोखरच दिव्य, दैवी कला आहे! स्ंगीतसे उद्वार होगा आपका अरु लोकका। संगीताने स्वत:चा व इतरांचा उद्वार होतो. क्षणभर सांसारिक बरबटीतून जीव उंच जातो. वर कोठे तरी विहरतो.
मी तेथे उभा राहिलो. एकनाथही तेथे आला.
''ह्याचं नाव दाजीबा'' एकनाथ म्हणाला
''आंधळे दिसतात,,'' मी म्हटले.
''हो. परंतु त्यांच्यासाखा सतार वाजवणारा सा-या सातारा जिल्हयात नाही. ते महाराजांकडे मुलींना शिकवायला जातात. महाराजांच्या पंक्तींच ताट त्यांना मिळतं. महाराज कीर्तन करतात, तेव्हा दाजीबा मृदंग वाजवतात. फार बहार येते. दाजीबा मोठे कलावान आहेत. ते नकला करतात, निरनिराळे आवाज काढतात,'' एकनाथ सारे सांगत होता.
''एकनाथ, चल अभ्यास कर,'' वामनने हाक मारली.
''तू कर तुझा अभ्यास. माझी नको काळजी,'' एकनाथ म्हणाला.
''अभ्यासापेक्षा संगीतच गोड आहे,'' मी म्हटले.
''माझं अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही,'' एकनाथ म्हणाला.
''मी आता जातो,'' मी म्हटले.
''सकाळी आंघोळीला हाक मारीन,'' एकनाथने सांगितले.
मी माझ्या खोलीत आलो. ती सतार सोडून मी का आलो? मला का एकनाथच्या वडील भावाप्रमाणे अभ्यास करायचा होता? नाही. मी प्रसन्न होण्याऐवजी खिन्न होऊन खोलीत आलो. आपल्याजवळ एकही कला नाही, असे माझ्या मनात आले. माझा राम उत्कृष्ट बासरी वाजविणारा होता. राम कलावान होता. माझ्याजवळ काही नाही. मला गाता येत नाही, वाजवता येत नाही, अभिनय करता येत नाही, चित्र काढता येत नाही. सायकलवर बसता येत नाही, घोडा दौडवता येत नाही, कुस्ती येत नाही, पोहता येत नाही, क्रिकेट येत नाही, मल्लखांब येत नाही, खो खो येत नाही, जमाखर्च येत नाही, व्यवहार येत नाही. मला देवाने असे का निर्माण केले? बरे, फार थोर बुध्दी तरी असती, तर तीही नाही. शेवटी जगात दुस-याजवळ आहे, ह्यातच आनंद मानायला आपण शिकले पाहिजे.