''कोणती दुसरी वस्तू?'' त्याने जिज्ञासेने विचारले.

''अरे, ह्या गणपतीच्या प्रसादाच्या तीन दूर्वा. हे वाळलेलं गवत. हे सुरकुतलेले तृणांकुर. ही श्रध्दा ह्या पत्रातून मला आली आहे. दरिद्री पिता, 'ईश्वरावर श्रध्दा ठेव', ह्यापलीकडे कोणता संदेश आपल्या मुलाला देणार, कोणती दुसरी मदत पाठवणार? श्रध्देचं भांडवल ते मला पुरवीत आहेत,'' असे म्हणून मी एकदम मुका झालो.

त्या तीन दूर्वा नेहमी माझ्या खिशात असत. कागदात गुंडाळून त्या मी ठेवल्या होत्या. मी श्रीमंत असतो, तर चांदीच्या डबीत ठेवून त्याचे स्मारक केले असते; परंतु श्रीमंत असतो, तर अशा देवावरच्या दूर्वा मला कोण पाठवता? मी गरीब होतो, म्हणून तर ते सौभाग्य लाभले. माझ्या हृदयाला त्या दूर्वा ऊब देत, आशा देत. माझ्या हृदयात थोडाफार जो सद्भाव आहे, थोडा फार जो संदेश आहे, तो त्या हृदयाजवळ बाळगलेल्या तीन पवित्र दूर्वांनी निर्माण केलेला आहे. वासना, विकारांनी बरबटलेल्या माझ्या जीवनात क्वचित कधी जो विचाराचा चंद्र दिसतो, तो त्या भालचंद्राच्या मस्तकावरले दूर्वांकुर हृदयाशी धरल्याचा परिणाम आहे. माझ्या वडिलांच्या श्रध्देचे ते फळ आहे.

अडीच रूपय अकस्मात मला मिळाले. मला त्या पैशाची कल्पना नव्हती. हे पैसे देवाच्या दूर्वांबरोबर आले. देवाला आवडणा-या कर्मातच ते खर्च करायचे मी ठरवले. गणपती म्हणजे ज्ञानाची देवता. सुंदर पुस्तके घेण्यात हे पैसे आपण दवडावे, असे मनात आले. त्या पैशात वाटले तर आणखीही थोडी भर घालायची, असेही मी नक्की केले. 'भट आणि मंडळी' ह्या पुस्तके विकण्याच्या दुकानी पुस्तकांचे गट विक्रीसाठी होते. त्यातला एक गट मी खरेदी केला. त्या गटात पुढील पुस्तके आली.

१ रामकृष्ण-वाक्सुधा (दोन भाग)
२ सुख आणि शांती
३ धम्मपद
४ विवेकानदांच्या मुलाखती व संभाषणे.

एकंदर पाच पुस्तके मी घेऊन आलो. मला अपार आनंद झाला होता घरी येऊन ती पुस्तके मी वाचीत बसलो. सारीच पुस्तके उत्रत विचारांची होती. 'रामकृष्ण-वाक्सुधा' खरोखरच अमृत-नदी होती. श्रीरामकृष्णांचे ते संवाद अपूर्व वाटले. गंगेचा घाट, कालीमातेचे मंदिर, सारे वातावरण त्या पुस्तकात पवित्र आहे. त्या वाक्सुधेच्या दोन भागांनी श्रीरामकृष्णांचाच महिमा मला कळला, असे नाही, तर इतर थोर बंगाली पुरूषांचीही माहिती मिळाली. प्रतापचंद्र मुजुमदार, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर हयांच्याशीही त्या पुस्तकांमुळे परिचय झाला. विवेकानंद वगैरे श्रीरामकृष्णांच्या चरणकमलांशी बसणारे सच्छिष्य, त्यांच्या अंतरंगाचे दर्शन झाले. कवी अनंततनय हयांनी मूळच्या बंगाली गीतांची मराठीत केलेली भाषांतरे त्या वाक्सुधाखंडांत होती. त्या कविता मी पाठ केल्या. ती गीते मी गुणगुणत बसे. त्या गाण्याचे जणू मला वेडच लागले. ती गाणी गात मी मस्त होऊन नाचे.

'सुख आणि शांती' हे पुस्तकही असेच अत्यंत सुंदर आहे. त्यातील रसमय भाषेला तुलना नाही. इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. कितीदा वाचले, तरी त्या पुस्तकाचा मला कंटाळा येत नसे. ते भाषांतर वाटले नाही. त्यात प्रसाद होता.

छोटया 'धम्मपदा'त बुध्दधर्माचे स्फुट सूत्रमय विचार होते. पालीतील मूळ ग्रंथाचे ते  मराठी भाषांतर होते.

'विवेकानंदांच्या मुलाखती व संभाषणे' म्हणजे मनाचे मोठेच खाद्य होते ते. 'विवेकानंदांची पत्रे' तत्पूर्वी मी वाचली होती. त्या पत्रांनी मला पागल बनवले होते. पत्रांच्या त्या लहानशा पुस्तकात केवढी प्रचंड स्फूर्ती होती! विवेकानंदांबद््दलचे सारे सारे वाचून काढण्याची इच्छा मला झाली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel