एकनाथ गाडी पळवीत होता. बैलांना पळवण्यात त्याला आनंद वाटत होता. एकनाथच्या डोकीच्या रुमालाचा शेमला माझ्या तोंडावर उडत होता. स्टेशन आले. बंडू फराळाला बसला. आम्ही आपापले सामान घेतले.

''श्याम, तुझ्या, तुझ्याजवळंच एखादं पुस्तक दे ना वाचायला. वडीलांना पण होईल,'' एकनाथ म्हणाला.
''सेतूबंधनी टीका' देऊ? विष्णुबुवा ब्रम्हचारीकृत आहे. तुझ्या वडिलांना आवडेल. आणि तुला कोणते देऊ? कर्व्यांचं आत्मवृत्त देऊ? छान आहे,'' मी म्हटले.

एकनाथला दोन्ही पुस्तके दिली. त्याने माझ्या ट्रंकेतली आणखीही एक-दोन निवडून घेतली, 'चंदावरकरांचे लेख व व्याख्याने' हे इंग्रजी पुस्तक मी वरच ठेवले. गाडीत वाचायला होईल, असे वाटले. एकनाथला गाडी घेऊन लवकर परत जायचे होते. तो निघाला. मला खूप वाईट वाटले. दिलदान मनाचा व पीळदार शरीराचा एकनाथही जरा सद्गदित झाला. त्याची गाडी निघाली. किती तरी वेळ त्याच्या गाडीकडे मी बघत होतो.

माझा पाय अजून दुखत होता, जोराने टेकवत नव्हता. आम्ही सारे प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. आली एकदाची गाडी. गाडीत चिक्कर गर्दी होती. गाडी पाच मिनिटे थांबे! मी हमाल केला नव्हता. खांदयावर ट्रंक व हातत वळकटी घेऊन, मी लंगडत, धावत होतो. कोणी डबा उघडू देईना. एका गृहस्थांना दया आली. त्यांनी उबा उघडला. शिरलो आम्ही आत. गोविंदा बंडूही आले. सखाराम दुसरीकडे बसला. गाडी सुरू झाली. चंदावरकरांचे लेख व व्याख्याने हे भले मोठे इंग्रजी पुस्तक वर होते, ते मी वाचू लागलो. त्या दार उघडणा-या सद्गृहस्थांस जरा कौतुक वाटले.

'' तुम्ही विद्यार्थी आहांत वाटतं?'' त्यांनी विचारले.
'' हो! मी औंधला शिकतो,'' मी म्हटले.
'' कोणत्या वर्गात आहांत तुम्ही?''
'' सहाव्या इयत्तेत.''
'' हे इंग्रजी पुस्तक तुम्हांला समजतं का?''
'' पुष्कळसं समजतं. न समजेल तिथे अंदाजाने अर्थ लावतो.''

अशी आमची प्रश्नोत्तरे चाललेली होती. थोडया वेळाने धीर करून मीच त्यांना प्रश्न केला, ''आपण कुठे असता?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel