करा नदीच्या तीरावरचा तो मोरेश्वर माझे हेतू सफळ करील का, असा विचार माझ्या मनात आला. हेतू पूर्ण होवोत, वा न होवोत, 'देव करतो ते ब-यासाठी,' हे, आईचे एका वेळचे श्रध्दामय शब्द माझ्या मनात उभे राहिले. आईची आठवण आली. मी केव्हा बरे आईला भेटेन, असे मनात येऊन, मी गहिवरलो. मला रडू येऊ लागले.
''का रे रडतोस?'' एकाने विचारले.
''आईची आठवण येऊन,'' मी म्हटले.
''तुझी आई नाही का?'' पुन्हा प्रश्न आला.
''आहे. माझी आई आहे. ती लांब आहे. कोकणात आहे,'' मी म्हटले.
स्टेशने येत होती, जात होती, माझ्या शेजारच्या इस्तरीवाल्याने फराळाचा डबा काढला त्याने डबा सोडला. तो मला देऊ लागला.
''नको,'' मी म्हटले.
''का?'' त्याने विचारले.
''तुम्ही मला भिकारी समजता!'' मी म्हटले
''नाही. मी तुला श्रीमंत समजतोय,'' तो म्हणाला.
''थट्टा आहे ही,'' मी म्हटले.
''आईची आठवण येऊन रडणारा श्रीमंतच आहे, माझ्या आईचा फोटो मी नेहमी खिशात ठेवीत असतो,'' तो म्हणाला.
''काही वेळापूर्वी त्यालाच का तुम्ही वंदन केलंत?'' मी विचारले
''हो,'' असे म्हणून त्याने आपल्या आईचा तो फोटो मला दाखवला. मी तो हातात घेतला. मी माझा माथा नमवला. क्षणभर डोळे मिटले. मी तो फोटो भक्तिभावाने परत दिला. त्याने भक्तीभावाने खिशात ठेवला.
''घ्या, आता. खा,'' तो म्हणाला.
मी फराळ करु लागलो, प्रत्येकाच्या हृदयात पूज्यबुध्दी आहे. भक्तिभाव आहे. त्याशिवाय मनुष्य जगूच शकणार नाही. आपण बाहेरुन कितीही ओबडधोबड, अहंकारी, उन्मत दिसलो, तरी आपले हृदय कोठेतरी भक्तीभावाने लवत असते, आपले शिर कोठेतरी नमत असते.
पुणे जवळ येऊ लागले. चोरांची आळंदी आली. एक देवांची आळंदी, एक चोरांची आळंदी ! केवढा फरक! एक भक्तिभावासाठी प्रसिध्द, तर एक दुष्कृत्यांसाठी प्रसिध्द ! परंतु त्या चोरांच्या आळंदीस अंजीर फारच छान होतात. ''इथली फळं प्रसिध्द आहेत,'' असे गाडीत कोणीतरी बोलला. मला अर्थात काहीच माहीती नव्हती.
माझे लक्ष आता पुण्याकडे लागले स्टेशन आले, मी एक टांगा ठरवला. नारायण पेठेत ते घर शोधीत आलो. मी सामान घेऊन वाडयात शिरलो. तेथे देवडीवर भय्या होता. त्याने हटकले. मी उभा राहिलो. मला आलेले पत्र मी त्याला दाखवले. तो भय्या ते पत्र घेऊन आत गेला.
एक धीरगंभीर मूर्ती बाहेर आली. त्यांनी चौकशी सुरु केली.
''तुम्ही काय शिकवाल ?'' त्यांनी प्रश्न केला.
''मराठी. संस्कृत. थोडं इंग्रजी,'' मी म्हटले.
''आमच्या मुलांबरोबर मराठी पुस्तकं वाचा. संस्कृत श्लोक, स्तोत्रं शिकवा. रोज सकाळी तास-दीड तास येत जा,'' ते म्हणाले.
'' मी आपल्याकडे राहू ना?'' मी विचारले.