आण्णसाहेबांचा स्वाभिमान पराकोटीचा होता. एकदा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारचे जुने दिवाण मुंबईला आले होते. १८५७ च्या स्वांतन्नययुध्दाच्या वेळेस शिंद्याचे हेच दिवाण  होते. हयांनीच शिंदे सरकारला त्या युध्दात पडू दिले नाही. त्या वेळेचा व्हाइसरॉय कॅनिंग ह्याने लिहून ठेवले होते. ''शिंदे बंडात सामील होतील, तर साराच ग्रंथ आटोपेल,'' शिंदे सरकार बंडात सामील होते, तर एकजात सारी राजपूत संस्थानेही उठणार होती, सारे राजे-रजवाडे शिंद्याची वाट पाहात होते;परंतु शिंदे शांत राहिले. शिंदे तर तेव्हा बालवयी होते. सूत्रे दिवाणांच्या हातात होती ह्या दिवाणाने हिदुस्थानाला दास्यात लोटले! अण्णापासून कळले, की ते देशद्रोही दिवाण आले आहेत. अण्णासाहेबांना हातात सोटा असे. तो सोटा घेऊन ते त्या दिवाणाकडे गेले व सोटा उगारून म्हणाले,'' हरामखोरा, तू देशाचं वाटोळ केलंस, तू हे परके पाय इथे पक्के केलेस,'' असे क्रोधाने म्हणून व आग पाखडणा-या दृष्टीने बघून, अण्णासाहेब निघून गेले! दिवाण्साहेबाच्या व इतर मंडळी जागच्या जागी थिजून गेली.

अण्णासाहेबांच्या पाश्चात्य वैघक पूर्णपूणे जाणत होते परंतु आयुर्वेदाचा त्यांनी उध्दार केला. आयुर्वेदातील उपाय ते मोफत सांगायचे  रोग्याला बरे करण्याच्या कामी ते संगीताचाही उपयोग करीत. ते स्वत: संगीताचे मोठे भोक्ते होते. मोठमोठे गवई त्यांच्याकडे यायचे. एकदा एक दाक्षिणात्य संगीतज्ज्ञ त्यांच्याकडे आला होता. एका रोग्याला झोप लागत नव्हती. अण्णासाहेबांनी एक विश्ष्टि राग आवळायला त्या गवयाला सांगितले. तो राग ऐकता ऐकता रोग्याला गाढ झोप लागली.

पुण्याच्या म्युनिसिपालिटीत अण्णासाहेब निवडले जायचे लोक आपण होऊन त्याना निवडून पाठवायचे. पुण्याच्या गणेशोत्सवाचा विर्सजनासाठी जिवंत असेपर्यत अण्णासाहेबाकडूनच व्हायचा. अण्णासाहेब म्हणजे पुण्याची ह्या महाराष्ट्राची पुण्याई होती.लोकमान्यांवर त्यांचे निरतिशय प्रेम त्यांची सारी तपश्चर्या लोकमान्यांसाठी होती. श्रीरामकृष्ण परमंहस एकदा विवेकानंदाना म्हणाले, '' माझी सारी साधना तुला देतो, घे.'' अण्णासाहेबांचे तसेच होते. ते विरक्त झाले होते. ते ईश्वरात रममाण झाले होते. परंतु ती सारी साधना लोकसेवेत अहोरात्र झिजणा-या लोकमान्याना त्यांनी दिली. ओंकारेश्वराच्या स्मशानभूमीत ते रात्रीबेरात्री हिंडत राहायचे ! स्मशानभूमी म्हणजे मृत्युंजयाचे निवासस्थान ! मृत्यूभूमीत बसून ते मृत्यूंजयाजवळ एकरूप होत. घरी कोनाडयात त्यांच्यासाठी काही खाण्यापिण्याचे ठेवण्यात येत असे त्यातील थोडेसे खात झोप ते जवळजवळ घेतच नसत. ते म्हणत,''' आमच्या शरीराला नेहमी झोपच आहे'' देहाचा विसर पडलेल्या जीवनमुक्ताच्या मुखातच हे थोर शब्द शोभतात शरीराची विस्मृती व आत्मारामाची स्मृती!

अण्णासाहेब शेवटी शेवटी काहीच खातेनासे झाले. अमृतत्वाचा चारा त्यांचा प्राणहंस खाऊ लागला. अण्णासाहेबांची मुले लोकमान्याकडे गेली व म्हणाली,'' तुम्ही तरी दोन घास खाण्याबददल सांगा,'' त्या वेळेस लोकमान्य म्हणाले,'' त्यांच्यापेक्षा का जास्त आपल्याला समजंत? ते करताच तेच बरोबर आहे. त्यांना त्रास नका देऊ.''

अण्णासाहेबांनी किती गोष्टी मी सांगू? आज मला त्यांच्या अनेक गोष्टी माहीत आहेत. परंतु त्या वेळेस कोठे माहीत होत्या? मी घरातून बाहेर पडलो. अंत्ययात्रा कोठे दिसते का पाहू लागलो. बुधवारापासून अंत्ययात्रा येत होती. शेकडो दिंडया भजन करीत चालल्या होत्या. पालखीत महर्षीचा देह पुष्पहारांनी सुशोभित करून ठेवला होता. मी दर्शन घेतले. त्या जनसागरात मीही गेलो. मीही भजन म्हणू लागलो. पुण्याच्या विश्रामबाग वाडयात त्या वेळचे सरकारी हायस्कूल होते. ते बंद करण्यात आले नव्हते. कोणी शाळेवर दगड फेकले शाळेचा तेथे निषेध करण्यात आला. पुष्करणीच्या हौदावरून अंत्ययात्रा गेली. पुढे ती नारायण पेठेकडे वळली व ओंकारेश्वरावर आली. सारे नदीतीर माणसांनी फुलले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel