खरा मातृभक्त
माझी आई कित्येक वर्षे आजारीच होती. बरे वाटले, की उठावे; ताप आला, की निजावे; असे तिचे चालेले होते. त्यातच तिला सदानंदाच्या मरणाचा मोठा धक्का बसला. कर्जामुळे घराची जप्ती होण्याची दवंडी कानांवर पडली! सदानंदाच्या मरणापेक्षाही तो अब्रूला बसलेला धक्का तिला सहन झाला नाही, जगण्यात आता तिला अर्थ दिसेना. जीवनात तिला राम वाटेना. हळूहळू आई अंथरूणाला खिळली.
तिच्या आजारपणाची सत्यस्थिती वडिलांनी मला हेतुपुरस्पर कळवली नाही. श्यामचा अभ्यास बुडू नये, श्यामला चिंता नसावी, श्यामचे शाळेत नीट लक्ष लागावे, असे त्यांना वाटे. आईचे दुखणे विकोपाला जात होते, तरी श्यामला त्याची वार्ता नव्हती. काळजी करू नये, असे वाक्य वडिलांच्या पत्रात नेहमी असायचे. माझी मावशी रजा घेऊन कोकणात गेली. बोटी बंद होत्या. ती क-हाडपर्यंत रेल्वेने गेली. पुढे क-हाडहून चिपळूणला ती मोटारने गेली. त्या वेळेस पावसाळयात क-हाड ते चिपळूण दहा रूपये तिकीट असे. चिपळूणपासून माझी मावशी पायी गेली बारा-तेरा कोसांचा प्रवास होता. ते पावसाळयाचे दिवस. नदी-नाले भरलेले असायचे. पावसाची झड लागलेली असायची. दिवसा अंधार व्हायचा व भीती वाटायची; परंतु माझी मावशी गेली. प्रेमाचा दिवा तिच्या हृदयात होता. बहिणीबद्दलची भक्ती तिच्या हृदयात होती. त्या भक्तीमुळे मावशीला काही कठीण वाटले नाही.
बोटी सुरू होताच मुंबईहून माझा भाऊ दोन दिवसांची रजा घेऊन जाऊन आला. आईने त्याला परत पाठवले. मला काही कल्पनाही नव्हती. त्या वेळेस दिवाळीची आम्हांला सुट्टी लागली होती. मी घरी जाणार नव्हतो. एके दिवशी अकस्मात माझ्या मनात आले, की घरी जावे. मी निघालो. मी मुंबईला आलो. बोटीत बसून मी हर्णे बंदरात उतरलो. तो तेथे मावशीची भेट झाली. मी मागे माझ्या आईच्या आठवणाी सांगताना ते सारे सांगितले आहे. आई देवाघरी गेल्यामुळे मावशी पुण्याला परत जात होती. स्नेहऋण, प्रेमऋण, फेडून ती परत जात होती. आणि श्याम! अभागी श्याम रडू लागला. आईचे न ऐकता मी मागे निघून आलो होतो. 'श्याम, संक्रात होऊन जा,' असे ती सांगत असता, अभिमानाने मी निघून आलो होतो. अभिमान व अहंकार जेथे ओतप्रोत भरलेले आहेत, तेथे देव कसा राहील? अभिमानी श्यामला आई शेवटची भेटली नाही. ती माझी सारखी आठवण काढीत होती. तिला मी दिसत होतो. आपल्या अहंकारी पोराला ती निरहंकारी माउली मरताना आठवीत होती. थोर माता! देवाने थोर माता आम्हांला दिली. आम्ही त्या देणगीला लायक नव्हतो. देवाने देणगी परत नेली. ती देणगी अदृश्य होताच आम्ही रडू लागलो.
माझ्या जीवनातली आशा गेली, प्रकाश गेला. माझ्या जीवनाचे सूत्र तुटले. माझ्या जीवननौकेचे सुकाणू नाहीसे झाले, माझे सारे मनोरथ धुळीत मिळाले. माझ्या आईला मी सुखवीन हे माझे ध्येय मला मिळाले नाही. ती अतृप्त आशा मला सारखी दु:खी करीत असते. माझ्या जीवनात एक प्रकारचा कायमचा अंधार त्या वेळेपासून आला. एक प्रकारची अगतिकता, निराधारता त्या वेळेपासून माझ्या जीवनात शिरली आहे.