एकदा मंडईत मी गेलो होतो. त्यावेळेस एक भविष्य सांगणारा कुडबुडया जोशी माझ्याजवळ आला. ''दादाचं नशीब थोर आहे, जिवाचे मित्र भेटतील, सुखाचे सांगाती लाभतील. मायबापांचा भारी लोभ आहे. तुझ्यावर. तरी पण रायाच्या मनाला चिंता आहे. अत्र गोड लागत नाही, झोप येत नाही. चिंता नको करू राजा. सारं भलं होईल. देवाची कृपा आहे. फार कृपा आहे. मी मागेन ते देशील? बोल. कचरू नको. माझा दावा नाही. मनाला वाटलं, तर 'होय' म्हण. पायातले जोडे देशील? माझे पाय अनवाणी भाजतात. राम तुझ्यावर दया करील. देतोस गरिबाला जोडे?''
त्या कुडबुडयाची ती वाग्वैजयंती ऐकून मी तल्लीन झालो. आशा देत होता. त्याच्या पायांत काही नव्हते. मी त्याला माझ्या पायांतले जोडे दिले! म्ी फसत नव्हतो. जाणूनबुजून मी जोडे दिले, विचार करून दिले.
''शाबास! असा धर्मात्मा पाहिला नाही. तुझं संकट पळेल. तुझे वाईट दिवस जातील. देवाची कृपा आहे, गरिबांची दया आहे राजा तुला. एवढा अंगातला कोट देतोस मला गरिबाला? माझा हट्ट नाही, माझा दावा नाही. मनाला वाटलं तर दे, मनातला राम सांगेल तर दे.''
मी माझा कोट काढला व त्याला दिला! मी मग मात्र तेथे थांबलो नाही. तो आणखी काय मागेल, ह्याची मला भीती वाटली. शेवटी तोंडाने 'नाही' म्हणायची पाळी येईल. मी सत्वच्यूत होईन, अशी मला भीती वाटली. माझ्या तोंडातून नकार येऊ नये, असे मला मनापासून वाटत होते.
मुखास माझ्या न शिवो नकार।
निघो मुखातून सदा रूकार॥
मी भाजी घेऊन घरी आलो, अंगात कोट नाही, पायांत जोडे नाहीत.
''श्याम, तुझा कोट कोठे आहे?'' रामने विचारले.
''एकाने मागितला, मी दिला!'' मी म्हटले.
''आणि जोडे?'' पुन्हा प्रश्र आला.
''अनवाणी हिंडणा-या एका भिका-याला दिले,'' मी शांतपणे सांगितले.
''मी तर अशाला खरोखरच 'जोडे' दिले असते,'' अनंत म्हणाला.
''अगदीच तू भोळा सांब,''राम म्हणला.
''मी भोळा नाही. मी जाणूनबुजून देत होतो. आपल्याला देववंत की नाही, हे मी पाहात होतो. मी माझी परीक्षा घेत होतो,'' मी सांगितले.
मित्रांनो, त्यागाचीही सवय करावी लागते. तोही एक अभ्यास आहे. चिंधीचा तुकडा का असेना, त्यातही आपली अपरंपार आसक्ती ओतलेली असते. मनाला काहीही न वाटता हे अंगावरचे कपडेच काय, हे दाग-दागिनेच काय, परंतु हे शरीरही वाटेल तेव्हा हसत हसत फेकून देता आलं पाहिजे. श्रीरामकृष्ण परमहंस एका हातात रूपया घेत, एका हातात माती घेत. माती काय, रूपया काय, असे मनात आणून गंगार्पण करीत। आत्म्याला प्रगट करण्याकरता, आत्म्याच्या भोवती सदैव उभी असलेली सहस्त्र बंधने फेकून देण्याची तयारी करावी लागते. आपल्याला एक चिंधी देववत नाही, मग ही देहाची खोळ ध्येयासाठी देणे दूरच राहिले. चिंध्यांना जपणारे देहाला किती जपत असतील? देहाची चिंधी फेकून देण्याची मला हिंमत नाही. देहाचे वस्त्र वेळ येताच टरटर फाडून मी फेकून देईन, अशी मला शक्ती नाही. देहाला सजवणारी वस्त्रे मात्र फेकून देण्याची माझी सदैव तयारी असते, ही गोष्ट मी मनाला शिकवली आहे. एक पाऊल तरी मी पुढे टाकले आहे. ध्येयाकडे जाणा-या अनंत पाय-यांच्या सोपानाची एक पायरी तरी मी चढलो आहे.