''परंतु आता तर तसं काही नाही ना? मी माझ्या सर्व मित्रांना तुझ्याकडेच घेऊन आलो. तुझी झोपडी मला राजवाडयापेक्षा मोठी आहे,'' शंकर म्हणाला.
इतक्यात दारात टांगा आला.
''आले रे पावसात भिजून. शंकर, कंदील घेऊन पुढे हो,'' ताई म्हणाली.
शंकरने कंदील दाखवला.
''कोण? शंकरभाऊ? केव्हा आलेत? म्हटलं विसरलेत गरीबाला,'' हरी म्हणाला.
हरीने घोडा सोडला. टांगा एका बाजुला केला. हरी घरात आला. त्याने ओले कपडे काढले. ताईने पिळून वाळत टाकले. दुसरे कपडे तिने दिले.
''हे घ्या कढत पाणी,'' ती म्हणाली.
हरीने पाय धुतले. तो भाकरी खायला बसला.
''तूही बस की माझ्याबरोबर आता, मागून कशाला?'' हरी म्हणाला.
''आज शंकर आपले मित्र घेऊन आला आहे. त्याचे मित्र पलीकडे झोपले आहेत,'' ती म्हणाली.
''त्याचं जेवणाखाण झालं का ?'' त्याने विचारले.
'' हो, '' शंकर म्हणाला.
'' दूधबीध आणलंस की नाही ? त्याने विचारले.
दूध काही आणलं नाही, '' ती म्हणाली.
'' आपल्याकडे कधी न येणारे पाहूणे, त्यांना दूध द्या की नाही? हरी म्हणाला.
'' सकाळी देऊ की,'' ती म्हणाली.
त्या प्रेमळ श्रमजीवी जोडप्याने जेवण झाले. गरिबीतही किती समाधान, प्रेम, आदरातिथ्य, माणूसकी किती श्रीमंत व सुशिक्षित कुटुंबात असे पवित्र समाधान असेल? असे गोड प्रेम असेल? असे आदरातिथ्य असेल?
'' शंकर, नीज आता, तुला पाणी काढायला लावलं रात्रीचं,'' ताई म्हणाली.
'' मग उदया दिवसा लाव,'' शंकर हसत म्हणाला.
सरी मंडळी झोपली, शंकराची ताई सर्वाच्या आधी पहाटे उठली. पाऊस थांबला होता. ती जात्यावर दळीत होती. गोड ओव्या म्हणत होती. जणू ते वेदोच्चारणच होते. मला वाटे. आपण जाऊन हात लावावा. घरी मी आईला दळू लागत असे ते मला आठवले; परंतु जाण्याचे धैर्य होईना. इतक्यात शंकर उठला व ताईबरोबर दळू लागला. निर्मळ प्रेम निर्भय असते. मी मनात चर्चा करीत होतो. शंकर बहीण-भावंडाचे प्रेम अनुभवित होता.
हळूहळू आमची सारी मंडळी उठली. सर्वाची शौच-मुखार्जने झाली. हरी दूध घेऊन आला. स्वच्छ अशा फुलपात्रांतून सारे जण दूध प्यालो. आम्ही वाडीला जायला तयार झालो. पायीच जाणार होतो. आम्ही वाडीला जायला तयार झालो. पायीच जाणार होतो. आम्ही ताईला व हरीला नमस्कार केला. शंकरला वाईट वाटले. कडेवर मूल घेऊन ताई उभी होती.