''श्याम, आता का आंघोळ करुन आलास?'' मुजाबरने विचारले.
''नाही. भांडी घासून आलो,'' मी म्हटले.
''सकाळी घासली असतीत! काल रात्री तिकडे केवढा मोठा साप मारला!'' मुजावर म्हणाला.
''म्हटलं भांडयांना तिष्ठत कशाला ठेवा? आपल्यासाठी ती घाणेरडी झाली, त्यांना स्वच्छ करुन ठेवले, तर ती आशीर्वाद देतील,'' मी म्हटले.
''असं रात्रीचं जाणं धोक्याचं असतं,'' तो म्हणाला.
''देव तारी त्याला कोण मारी?'' मी म्हटले.
''सुखातला जीव मुद्दाम दु:खात घालू नये,'' तो म्हणाला.
''खरं आहे तुझं म्हणणं, मला भीती वाटू लागली, म्हणूनच तर तिथे रमलेला मी उठून आलो. 'देव तारी त्याला कोण मारी' ह्यावर माझी तरी कुठे आहे एवढी श्रध्दा. स्वत:च्या हातापायंवरच,'' मी म्हटले.
''श्रध्दा म्हणजे मरणं' असं एक इंग्रजी वाक्य आहे,'' मुजावर म्हणाला.
''किती यथार्थ आहे ते,'' मी म्हटले.
मुजावर गेला. मी माझ्या खोलीत आलो. मी वाचीत पडलो होतो. वाचता वाचता मला केव्हा झोप लागली, ते समजलेही नाही. दिवा तसाच जळत होता. दार मी उघडेच ठेवीत असे.
''रात्री दिवा तुम्ही का मालवलात?'' सकाळी मी आजीस विचारले.
''हो. आणि तुझ्यावर पांघरुण घातलं. दिव्याला झोपेत हात लागता, तर भाजता. दिवा पडता नि पेटता,'' मी म्हणाली.
''आजी जवळ असली, म्हणजे काळजी नाही. 'निकटे जागति जान्हवी जननी'' मी म्हटले.
''श्याम, जवळच्या महादेवाला आज आम्ही जाणार आहोत. बैलगाडी केली आहे. संध्याकाळला परत येऊ'' आजी म्हणाली.
''माझी शाळा आहे, नाहीतर मी आलो असतो,'' मी म्हटले.
''म्हणूनच तर मी बोलवीत नाही,'' ती म्हणाली अन निघून गेली.
द्रुपदीची आई म्हणाली,''श्याम, अरे पीठ असलं, म्हणजे ताटात घालून माझ्याकडे देत जा. आमच्या भाक-यांबरोबर तुझ्याही भाजून ठेवीत जाईन. तवा तापलेलाच असतो.
मी उरलेले पीठ तिच्याजवळ दिले नि अभ्यास करीत बसलो. दोन भाक-या आल्या. मी त्या ठेवून दिल्या. द्रुपदीची आई कामाला गेली. दहा वाजता मी भाकरी कोरडीच खात होतो. इतक्यात मुजावर आला.
''श्याम, तुझी भाषांतराची वही जरा दे बघू,'' तो म्हणाला.
''मी जेवतोय. घे तिथली,'' मी म्हटले.
''हे काय? कोरडीच भाकरी?'' त्याने विचारले.
''कोरडं खाल्लं म्हणजे लाळ चांगली सुटते. पचतं चागलं नि पुरतं थोडं,'' मी म्हटले.
''मी थोडी आमटी आणून देऊ? आताचा बोर्डिंग घेऊन आलो,'' तो म्हणाला.
मी काही बोललो नाही. मुजावर वही घेऊन गेला. तो आमटी घेऊन आला. मी माझे ताट पुढे केले. त्याने ओतली.