“खाऊं झाडाचा पाला, पिऊं अंजनीचें पाणी.”

“दिसेल पुढें काय कराल तें.”

दादा निघून गेला. आणि जगन्नाथाने पुन्हा गाणें सुरू केलें व गुणा साथ करूं लागला. दादा पुन्हा आला नाहीं. थोड्या वेळाने संगीत थांबलें. गुणा घरी गेला.

परंतु दस-याच्या दिवशींचा प्रकार तर याहून वाईट झाला. दसरा सणाचा दिवस. जगन्नाथाच्या घरीं आज घोडे शृंगारले होते. त्यांच्या गळ्यांत सुंदर झेंडूच्या माळा होत्या. पाठीवर चांदीचे दागिने घालण्यांत आले होते. घोडे आनंदाने फुरफुरत होते. सकाळीं गांवांतून ते वाद्यांच्या तालावर नाचत थै थै करीत मिरवून आले. जगन्नाथही आज नटला होता. सुंदर रेशमी कपडे अंगावर होते. जरींचे घोतर नेसला होता. गळ्यांत गोफ व कंठी त्याने घातली होती. कानांत सुंदर कुडक्या घातल्या होत्या. बोटांतून आंगठ्या होत्या. फार सुरेख दिसत होता. सुंदर सजून आपल्या मित्राची तो वाट पाहत होता.

बराच वेळ झाला. परंतु गुणा आला नाहीं. खिडकींतून जगन्नाथ सारखें बाहेर पाहत होता. परंतु गुणाचें दर्शन झालें नाहीं. कां बरं गुणा आला नाहीं? आज सणाचा दिवस, मंगल दिवस! कां बरें माझा गुणा आला नाहीं? जगन्नाथ अस्वस्थ झाला. तो आईकडे गेला व म्हणाला, “आई, मी गुणाकडे जाऊन येतों.”

“बाळ, आज अंगावर दागिने आहेत. एखादा बलुची नेईल हो धरून. परवां गांवांत कोणाला तरी त्यांनीं असेंच धरून नेलें. दागिने काढून सोडून दिलें.” आई म्हणाली.

“मग हे काढून ठेवूं का? तुझा आग्रह म्हणून मी घालतों.”

“अरे घालावे हो सणावारीं. आज नाहीं घालायचे तर कधीं घालायचे आज आनंदाचा दिवस.”

“आई, सगळ्यांना का दागिने असतात? आपल्या मळ्यांतील जनीच्या मुलांच्या
अंगावर कपडेसुद्धां नसतील.”

“बाळ, देवानें ज्याला वैभव दिलें आहे त्यानें तें भोगावें.”

“देवानें त्यांना कां ग दिलें नाहीं? आपल्यालाच कां दिलें?”

“मला नाहीं रे माहीत. कांहीं तरी विचारशील. तरी बरें, अजून मॅट्रिक दूर आहे.”

“आई, मॅट्रिक झालों म्हणजे का मी फार शहाणा होईन?”

“आजच आहेस तूं फार शहाणा. जा, ये जाऊन त्या गुणाकडे. लौकर ये. उन्हांतून कोठें जाऊं नको. हें आश्विन-कार्तिकी ऊन बाधतें हो.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel