एके दिवशी जगन्नाथ तेथून गेला. इंदिरेचा निरोप घेऊन गेला.
“चांगली हो, चांगली रहा. सर्वांची शाबासकी मिळव.” तो म्हणाला.
“तुम्ही पत्र पाठवीत जा आणि मी येईपर्यंत जाऊ नका. खरेच नका जाऊं.”
“तें मी बघेन. बाबाच जा म्हणाले तर?”
“जे योग्य ते करा.”
जगन्नाथ गेला. इंदिरेला वाईट वाटले. परंतु समाधानहि वाटले. आपल्या इच्छांना मान देणारा आपला पति आहे ही गोष्ट तिला दिसून आली. तिला आनंद झाला. जगन्नाथलाहि आनंद वाटत होता. आपल्याला अनुरूप पत्नी मिळाली म्हणून तो सुखावला होता. त्याला कल्पनाहि नव्हती की इंदिरा अशी आपल्या ध्येयाला दुरून पाणी घालीत असेल. आपल्यापेक्षाहि ती मोठ्या मनाची आहे, उच्च विचारांची आहे, म्हणून जगन्नाथ आनंदला.
एरंडोलला तो एकटाच आला.
“इंदिरा रे?”
“तिला तेथील आश्रमांतच ठेविले. महिलाश्रम. तेथे मुली शिकतात. अनेक कार्यकर्त्यांच्या पत्न्या, मुली तेथे आहेत. छान आहे वातावरण. येउ दे चार गोष्टी शिकून. येऊ दे चांगली होऊन. देशाच्या कामाला योग्य होईल.”
“तुम्ही मांडले आहे तरी काय?”
“आई, योग्य तेच करीत आहोत. पुढे चांगला संसार करतां यावा म्हणून तयारी करीत आहोत.”
“तूं ना जाणार होतास?”
“इंदिरा आली म्हणजे मी जाईन. तुमच्याजवळ नको का कोणी?”