इंदिरा न संपणारे गाणे म्हणत होती. हृदयनाथ जगन्नाथ शांत झोपला होता. त्रस्त जिवाला विश्रांति मिळत होती.
आता सर्वत्र आनंद होता. इंदूच्या घरी व इंदिरेच्या घरी लोक येत जात होते. मित्र येत होते. खेड्यापाड्यांतील शेतकरी येत होते. आनंद उचंबळला होता. पुढील कार्याचे बेत ठरत होते, योजना होत होत्या.
आणि एके दिवशी इंदिरा व इंदु, जगन्नाथ व गुणा पद्मालयाला गेली. वनभोजनास गेली. दोघे मित्र पाण्यांत पोहले. लाल कमळे त्यांनी तोडून आणली व इंदु-इंदिरेला दिली. फराळ करून सारी दाट जंगलांत हिंडत गेली. गुणा व जगन्नाथ बोलण्यांत रंगले होते. भावी कार्याचे विचार, संघटनेचे, क्रांतीचे विचार; सेवाधामाचे, आरोग्यधामाचे विचार! परंतु इंदु व इंदिरा कोठे आहेत?
“इंदु रे?” जगन्नाथने विचारले.
“आणि इंदिराताई?” गुणाने विचारले.
कोठे गेल्या दोघी?
“आतां आपण जाऊं त्यांना शोधायला. त्यांच्यासाठी आपण रडूं.” जगन्नाथ म्हणाला.
तो तिकडून इंदिरा व इंदु दोघी आल्या.
“कोठे गेल्या होत्यात?”
“आमच्या योजना ठरवीत गेलो होतो.” इंदु म्हणाली.
“आमची कामे करायला गेलो होतो.” इंदिरा म्हणाली.
“कसली कामे?” गुणाने विचारले.
“मी माळ गुंफायला गेले होते.” इंदु म्हणाली.
“मी मोरांची पिसे जमवून हा मुकुट करीत होते.” इंदिरा म्हणाली.
“बसा या दगडावर दोघे. गुणा हा हार तुझ्या गळ्यांत घालते. ही वनमाळा तुला शोभेल.” इंदु म्हणाली.
“आणि जगन्नाथ, तुला हा मोर मुकुट शोभेल.” इंदिरा म्हणाली.
ते दोघे मित्र देवाच्या मूर्तीसारखे शोभत होते.
“गुणा आतां सारंगी वाजव.” इंदु म्हणाली.
“जगन्नाथ तूं गा.” इंदिरेने प्रार्थिले आणि त्या वनांत संगीत सुरू झाले. स्वर्गीय संगीत.
बराच वेळ सारीं स्वर्गसुखात होती. स्मृतिसागरावर, भावना-लहरींवर सारी नाचत होती.