“सहावी झाली आहे.”

“वा! मग मॅट्रिक व्हाल. कॉलेजात जा. तुम्हांला शिकण्याची हौसच नाही की हौस आहे?”

“शिकावेसे तर मला वाटे. मला डॉक्टर व्हायची इच्छा असे. आजारी गोरगरिब पाहिले म्हणजे मला वाईट वाचे. मनांत येई मी डॉक्टर असतो तर? परंतु ही माझी इच्छा मी कधी कुठे बोललो नाही.”

“तुम्हांला डॉक्टरी काय करायची? तुम्हा सारंगी वाजवाल व रोग्याला हंसवाल, उठवाल, बरा कराल. डॉक्टरीची औषधे महाग, ती इंजेक्शने महाग. गरिबांना ती थोडीच घेता येतात! आणि तुम्ही तरी मोफत कोठून देणार?”

“मला निराळा डॉक्टर व्हायचे होते. निसर्गोपचाराचा डॉक्टर. आमच्या तालुक्यात पद्मालय म्हणून निसर्गसुंदर स्थान आहे. मला वाटे की तेथे निसर्गोपचार मंदिर स्थापावे. हवा, पाणी, प्रकाश, माती वगौरेचे उपचार करावे. डॉ. कुन्हे यांची पद्धति शिकावी. होमिओपॅथिचाहि अभ्यास करावा. किती विचार माझ्या मनांत येत. परंतु सारे लपवून ठेवले. कधी कुठे बोललो नाही. आमच्या तालुक्यांत ग्रामसेवेची पुष्कळ कामे सुरू आहेत. खादी, कागद वगैरे ग्रामोद्योगांना खूप चालना मिळत आहे. आम्ही खेड्यापाड्यांतून मेळे घेऊन हिंडत असू. विचारप्रसार करीत असू. मला वाटे की आपण पुढे कोणती सेवा करावी? असे डॉक्टर होता येईल का? निसर्गोपचारी डॉक्टर! परंतु आता काय? आता ही सारंगी आहे. तिच्यात मन रंगेल. मी लोकांना ती ऐकवीन. माझ्या आईबापांस ऐकवीन. आनंद पसरीन. खरे ना बाबा?”

“होय हो बाळ. तुझ्यासाठी मला काही ठेवता आले नाही. ना घरदार, ना शेतीवाडी. तुला शिकवता आले नाही, तुझे मनोरथ मातीत मिळवावे लागत आहेत. दरिद्री तुझा पिता. परंतु एक कला माझ्या मुलाला रावसाहेब मी दिली आहे; ती त्याला शिकवली आहे. जणुं ती उपजतच त्याच्या बोटांत होती, गरिबीतहि एक वस्ताद ठेवून त्याची मूळची कला मी वाढविली, ती कला बाळाला कमी पडू देणार नाही, ती त्याला जगाच मित्र देईल, स्नेही देईल. ती त्याला सहानुभूति मिळवून देईल, आधार मिळवून देईल.” पिता म्हणाला.

“आता यांनीच नाही का प्रेम दाखवले? येथे बसायला जागा दिली.” गुणा गोड स्वरांत म्हणाला.

पुढेहि जागा देईन. तुम्ही इंदूरला या सगळी. प्रथम माझ्याकडे उतरा; मग तुम्हाला रहायला जागा पाहू. होईल व्यवस्था. तुम्ही सारंगी शिकवा काहींना; पैसे मिळतील थोडे-फार. कॉलेजात जा पुढे. व्हा डॉक्टर. असले निसर्गोपचाराचे शिक्षण कोठे मिळते?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel