“पुरे आता संगीत.”
“आतां अंधार पडू लागेल.”
“सारंगी ऐकून साप येतील.”
“गाणे ऐकून हरणे येतील.”
“इंदु, तूं भित्री आहेस. पुरुष बरोबर आहेत. मग भीति कशाला?” इंदिरा म्हणाली.
“तुमच्यासारख्या स्त्रिया बरोबर असतील तर पुरुषांना भय नाही.” जगन्नाथ म्हणाला.
“भय एका पावित्र्याला नाही. पावित्र्य सांभाळते, पावित्र्य तारते. पावित्र्यासमोर वाघ क्रूरता विसरतो, सर्प दुष्टता विसरतो. वाघाची गाय होते. सापाचा हार होतो. पावित्र्यासमोर पुण्य होते, अंधाराचा प्रकाश होतो. पावित्र्य, पावित्र्य हा जीवनाचा अभंग कायदा, शाश्वत कायदा. याचा भंग झाला तर सारे भंगेल. हा अभंग ठेवू तर जीवन रंगेल. पावित्र्य म्हणजेच परमेश्वर. असे हे पावित्र्य ज्याच्याजवळ आहे तो खरा बळी, महाबळी. मग ती स्त्री असो, पुरुष असो वा मूल असो.” गुणा म्हणाला.
“काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा रंग अधिकच खुलतो. पतनानंतरचे चढणे, अध:पातानंतरचा उद्धार, उन्हानंतरचा पाऊस! त्यांत एक अनुपम सौंदर्य असते. काळ्या भूतकाळाच्या यमुनेच्या तीरावर भविष्याचा नयनमनोहर आरसपानी ताजमहाल अधिकच शोभून दिसेल नाही?” जगन्नाथ म्हणाला.
“हो जगन्नाथ. अश्रूंतून निर्माण झालेली इमारत अधिकच सुंदर दिसणार. ताजमहालहि हृदयाच्या अश्रूंतून जन्मलेला आहे.” गुणा म्हणाला.
मंदिरांतली घंटा घणघण वाजूं लागली.
“ती देवाची घंटा आपणांस साथ देत आहे.” इंदु म्हणाली.
“देवाची आरती, मंगल आरती सुरू होणार असेल. चला जाऊं.” इंदिरा म्हणाली.
“आता तो मुकुट काढ जगन्नाथ.” गुणा म्हणाला.
“इंदिरेला वाईट वाटेल म्हणून काढला नाही आणि तुझा हार रे?”
“इंदु रागावेल म्हणून मीहि काढला नाही.”
“जगन्नाथ, आण तो मुकुट. मी तो जपून ठेवीन. पुन्हां वनांत येऊ तेव्हा तुला घालीन. किती छान दिसतो तुला.”
“आतां पुन्हां वनांत कशाला जायचे? आता जीवनांत रमू, कांम करूं.” गुणा म्हणाला.
“जीवन हे वनच आहे.” इंदु म्हणाली.
“हो. जीवन म्हणजे कुंजवन आहे. तेथे मुरली आहे, कृष्ण आहे.” इंदिरा म्हणाली.
“तेथे कालिये आहेत, अघासुर, बकासुर आहेत. वणवे आहेत; सर्प, वाघ आहेत; काटेकुटे आहेत; खांचखळगे आहेत.” जगन्नाथ म्हणाला.
“परंतु काट्यांची फुले होतील, वणवे विझतील, साप निर्विष होतील. शेवटी सारे सुंदर होईल. शेवटी सारे गोड होईल.” गुणा म्हणाला.
“खरेच. शेवटी सारे गोड होईल. अश्रूंची फुले होतील, माणिक मोती होतील. दु:खांतून सुखाचे कोंब बाहेर येतील. सारे गोड, शेवटी सारे गोड!” इंदिरा म्हणाली.
आणि तिकडे घंटा घणघण घणघण वाजत होती. मंगलमूर्तीची पंचारती होत होती. ही चारी जणे तेथे जाऊन उभी राहिली. इंदिरा व जगन्नाथ, इंदु व गुणा भक्तिभावाने उभी होती. मंगलमूर्तीसमोर, विघ्ननाशकासमोर, सुखकर्त्या दु:खहर्त्यासमोर निरहंकारपणे उभी होती. त्यांच्या डोळ्यांतून अश्रु गळत होते. मंदिरांतील अणुरेणु एकच गोष्ट मुकपणाने सांगत होता व घंटा गर्जून सांगत होती की, “शेवटी सारे गोड होईल!”