“इंदिरे, आपण राम सीता नाही. आपण साधी माणसे. भोगी जीव. वासनाविकारांच्या आहारी जाणारी माणसें. राम सीता वनांत होती. प्रेमाने रहात होती. परंतु वनांत १२ वर्षे ती व्रतस्थ राहिली. सीतेला अयोध्येस आल्यानंतर लवांकुश झाले. आपण वनवासांत जाऊनहि संसार मांडू. भिका-यांचा संसार. इंदिरे, तूं येथे रहा. आई बाबा म्हातारी आहेत. त्यांची सेवा कर. मला जाऊ दे. काहीं वर्षांनी परत येईन. चारपांच वर्षांनी येईन. खरोखर हे माझे शिकण्याचे दिवस. कॉलेजांत गेलो असतो तर चार वर्षे शिकत राहिलो असतो. रूढीमुळे आपले लग्न यांनी उरकून टाकले. त्यांनी वेडेपणा केला, म्हणून आपण थोडाच करायचा आहे? तूहि घरी वाच. मी तुला चांगली चांगली पुस्तके पाठवीन. तुला पत्रेहि लिहित जाईन. सोपी, सुरेख पत्रे. तूहि मला लिहीत जा. आपण पत्राने भेटत जाऊ. एकमेकांचे वाढते विचार एकमेकांस कळवीत जाऊं. इंदिरे, रागावू नकोस. मी तुला तुच्छ नाही मानीत. तुझी माझी गाठ पडली आहे. तुझे सुखदु:ख माझ्याशी व माझे तुझ्याशी जोडलेले आहे. आपण आपला संसार सुंदर करूं, जगाला उपयोगी पडेल असा करू. तुझा पति साधा आहे. मला श्रीमंतीची आवड नाही. ही सारी इस्टेट गरिबांसाठी द्यावी वाटते. असा दरिद्री होऊ पाहणारा पति तुला आवडेल?”

“तुम्ही कसेहि असा, मला आवडाल. मी माहेरी होते. तुमच्याबद्दल निरनिराळ्या गोष्टी कानांवर येत. कोणी म्हणत तुम्हांला व्यवहार कळत नाही. कोणी म्हणत सारी इस्टेट घालवून बसतील. कोणी म्हणत तुरुंगात जातील. मी सारे ऐकत असे. आपल्या लग्नांतील गोष्टीहि मी विसरले नाही. भिका-यांना तुम्ही उष्टे घालू दिले नाही. त्या उष्ट्याच्या बादल्या मागे नेऊन, पुन्हा त्याच नेणार होते. परंतु मी भांडले. ज्या दिवशी आपले लग्न लागले त्या दिवसापासून मी तुमची बाजू घेऊन भांडू लागले. त्या दिवसापासूनच मी तुम्हांला ओळखू लागले. तुमच्याविषयी जसजशी टीका होई, तसतसे तुम्ही अधिकच माझे होत होतांत. केव्हा तुमच्याजवळ मी येईन असे वाटले. केव्हा तुमचे विचार समजून घेईन असे वाटे. शिरपूरला काही भगिनी प्रभातफेरी काढीत. गांधीजयंतीस खादी विकायला जात. मीहि त्यांच्याबरोबर जात असे. वाटे की तुम्हांला ते आवडेल. मी काँग्रेसचे सभासद सुद्धा करीत असे. न कळत तुम्ही मला शिकवीत होता. मला धैर्य देत होता. मला वाटे की एरंडोलला जाऊन आपण अधिक काम करू. हरिजनवस्तीत जाऊ. हळदीकुंकू करू आपल्या घरी. त्यांना बोलावू. तुम्हांला खरोखर सांगते की तुम्ही मला आवडता. दूर होतेत तरी आवडत होतेत. तुम्ही दूर होतेत. परंतु मी तुम्हांला जवळ घेत होते. तुमच्यासारखी होऊ पाहत होते. मला सारे सांगता येत नाही. परंतु तुम्ही कोठे जाणार असाल तर मला ठेवा ना एखाद्या आश्रमांत. तेथे मी तयार होईन माझेहि मन शिकेल. नाना गोष्टी मला कळतील. तुम्ही एकटेच का जाता? माझीही व्यवस्था करा. मी एकटीच येथे राहीन तर वेळ कसा दवडू? ठेवाल का मला एखाद्या आश्रमांत? वर्ध्याला महिलाश्रम आहे. ठेवाल तेथे? किंवा दुसरे काही शिकवा मला. पुण्याला कुठे ठेवा. माझी व्यवस्था करा. आपण दोघे शिकू. तुम्ही स्वत:चा विचार केलात माझा केलात का?”

“इंदिरे, तुझा नाही हो विचार केला. मी स्वार्थी आहे. तू माझ्या ध्येयाची दुरून ओळख करून घेत होतीस. परंतु मी माझ्याच विचारांत होतो. तुम्ही स्त्रियाच आमच्यापेक्षा अधिक त्यागी हे खरे. तुला आश्रमांत ठेवता येईल. परंतु आई व बाबा यांना ते आवडणार नाही. म्हणतील म्हातारपणी आम्हांला कोणीच नाही. दोघांनी जाणे बरे नाही दिसणार.”

“थोडे दिवस तरी मला पाठवा एखाद्या आश्रमांत. आधी मला पाठवा. मी आल्यावर मग तुम्ही जा.”

“परंतु आई व बाबा काय म्हणतील?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel