गुणा व जगन्नाथ दिवसेंदिवस तनानें, मनानें वाढत होते. ते केवळ संगीतवादनांतच रंगले नव्हते. जीवनांतहि ते डोकावूं लागले होते. आतां ते इंग्रजी सहाव्या इयत्तेत होते. त्यांची बुद्धि विचार करूं लागली होती. नवीन नवीन विचार त्यांच्या कानांवर येत होते. एरंडोलमध्यें राष्ट्रीय वृत्ति बळावत होती. काहीं देशप्रमी लोक तेथें राष्ट्रीय चळवळी करूं लागले होते. गरिबांत हिंडूं फिरूं लागले होते. कांहींनी कागदीपु-यांतील मुसलमानबंधूंचा कागदाचा धंदा पुन्हा कसा वाढेल या गोष्टीला वाहून घेतलें. कांहींनीं खादीचा धंदा शेतक-यांत नेण्यासाठीं कमरा कसल्या. कांहींनीं साक्षरताप्रसारक मंडळ स्थापून त्याद्वारां चळवळ आरंभिली. कोणीं शेतक-यांची संघटना करण्याचें ठरविलें. एरंडोलमध्ये निरनिराळ्या निमित्तानें निरनिराळे बाहेरचेहि कार्यकर्ते येत. चर्चा होत. व्याख्यानें होत. या सर्वांचा परिणाम या आमच्यां मित्रद्वयावर झाल्याशिवाय राहिला नाहीं. त्यांचीं मनें संस्कारक्षम होतीं. कोमल होतीं. भावनामय होतीं. कलेचा भक्त तोच होऊं शकतो कीं. ज्याचें हृदय इतरांपेक्षां अधिक भावनोत्कट असतें.

एरंडोल तालुक्यांत बाहेरचा एक सेवक आला होता. त्यांचे एकच काम तो सर्व तालुक्यांत हिंडत असे. खिशांत टळकी असे. एक पिशवी जवळ असे. गांवोगांव जावें, गांव झाडावा, एखाद्या झाडाखालीं बसावें, टळकी चालवावी. गुराखी येत. त्यांना टळकी शिकवावी. मुलें येत, त्यांना गाणीं शिकवावीं. रात्रीं तो अभंगरूप कीर्तन करी, लोक येत. कीर्तनांत अस्पृश्यता दूर करा, भांडणे कमी करा, कोर्टकचे-या कमी करा, साक्षर व्हा, उद्योगी व्हा, स्वच्छतेचे उपासक बना, वगैरे तो सांगे. गोष्टी सांगे, मधून मधून गाणीं म्हणे. कोणी तरी त्याला जेवायला बोलवी. न बोलावलें तर तो तसाच राही. मूठभर पालाच खाई. चिंचेचा पाला, निंबाचा पाला एकत्र करून तो खायचा.

दस-याच्या दिवशीं एरंडोलला या अवलियाचें भाषण झालें होतें. तें भाषण गुणा व जगन्नाथ यांना फार आवडलें होतें. सुंदर विचारप्रवर्तक भाषण. सीमोल्लंघनाचा सुंदर अर्थ. पुढें चला, पुढें चला. बिळांत बसूं नका. दुनियेंत काय काय चाललें आहे तें पहा. जो असा पुढें जातो, हृदय अधिक मोठें करीत जातो, बुद्धि अधिक मोठी करीत जातो, त्याला विजय मिळतो. आणि विजयादशमीलाच भगवाने बुद्धांचाहि जन्म. मनावर विजय मिळविणें याहून थोर विजय कोणता? मनोजयी होईल तोच विश्वजयी होईल. जगाची ज्याला सेवा करावयाची आहे त्यानें स्वत:ला जिंकलें पाहिजे. स्वत:चा स्वार्थ, स्वत:च्या सुखेच्छा, क्षुद्र मानापमानाच्या कल्पना, अहंकार, या सर्वांना त्यानें जिंकून घेतलें पाहिजे. जगाचें दु:ख त्यालाच दिसेल, जो स्वत:च्या ऐषआरामांतून जरा बाहेर आला. नाहींतर दुष्काळ पडला तर दिवाणखानी राजा सांगतो आहे दूधभातच खा. त्याला काय माहीत जनतेजवळ काय आहे, काय नाहीं? आपल्या सभोंवतालची जनता कोण पाहील? जो तिच्याकडे जाईल तो. जो स्वत:च्याच चिंतेंत चूर झाला तो बंधूंपासून दूर गेला. त्याच्या कानांत इतरांचे शोकसूर जाणार नाहींत. त्याच्या डोळ्यांना शेजारचे दु:खपूर दिसणार नाहींत. अशाला कोठला विजय, कोठली बंधुसेवा?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel