“मित्र सापडल्याशिवाय परत कसा येऊं?”

“तू मलाहि रडत ठेवणार?”

“इंदिरा रडत आहे. तूहि रड.”

“गुणा, आई बाबा गेले आणि तूं असे बोलतोस. कठिण हो आम्हां बायकांचे जीवन. आम्हांला आधारच नसतो जगांत.”

“इंदु, मग मी काय करूं? नको का शोधायला जायला? त्याचे आईबाप, इंदिरा, ही दु:खी असतां तुझ्याभोवती का गोंडा घोळत बसूं? हंसत खेळत बसूं?”

“जा हो गुणा. माझ्याभोवती नको गोंडा घोळूं. तू कर्तव्य करायला जा. मी रडणार नाही. मित्राच्या शोधाला तू जात आहेस, कर्तव्यासाठी मोह झुगारून जात आहेस; म्हणून मला तुझा अभिमान वाटेल. तूं मला अधिकच प्रिय होशील. तूं माझा अधिकच मोलवान् दागिना आहेस असे मी मानीन. जा. राजा जा.”

“आता खरी तूं इंदु.”

“आणि आधीं कोण होते?”

“आधी मोहमयी इंदु होतीस. आपणां सर्वांची दोन दोन रूपे आहेत. कधी आपले निर्मळ स्वरूप होते. तर कधी आपण मायापंकांत बरबटलेले असतो. आपणां सर्वांस नेहमी ग्रहणे आहेत. ती सुटतात, पुन्हा लागतात. चंद्रसूर्याची ग्रहणे सुटावी म्हणून आपण दाने करितो. दे दान सुटे गिराण म्हणून ओरडतो. परंतु आत्मसूर्याचे, आत्मचंद्राचे ग्रहण सुटावे म्हणून आपण दान करीत नाही. आसक्ति सोडीत नाही. इंदु, तू आज स्वत:चे निर्मळ स्वरूप दाखवलेस.”

“आणि मित्राच्या शोधार्थ जाणा-या गुणाचेहि दिव्य भव्य रूप पाहून मी कृतार्थ झाले.”

गुणा जगन्नाथच्या शोधासाठी बाहेर पडणार होता. परंतु एके दिवशी अकस्मात् दयाराम भारती एरंडोलला आले. तुरुंगात त्यांची प्रकृति फारच बिघडली होती. त्यांना सोडून देण्यांत आले. जगन्नाथच्या घरी ते आले. परंतु जगन्नाथ घरी नव्हता. ते गुणाकडे आले. गुणाने त्यांचे स्वागत केले.

दयाराम खूप अशक्त झाले होते. त्यांच्या अंगांत तापहि होता. गुणाने त्यांची नीट व्यवस्था लाविली. त्याने त्यांची प्रकृति नीट तपासली. काही औषधे त्याने मागवून घेतली. परंतु गुण येईना. इंदु व गुणा सेवा करीत होती.


कधी कधी खेड्यांतील शेतकरी भेटीस येत. आठवड्याच्या बाजाराचे दिवशीं गुणाच्या घराला यात्रेचें स्वरूप येई. शेकडों लोक दयाराम भारतींचे दर्शन घेण्यात येत. प्रणाम करून जात. कधी कधी विद्यार्थी येत. त्यांच्या तोंडून दोन शब्द ऐकायला मिळावे म्हणून येत. परंतु दयाराम फारसे बोलत नसत. त्यांना बोलवत नसे. जणुं दुस-या जगांत ते मनानें गेले होते. देह अद्याप पडला नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel