“अरे सुटसुटीत पडदे. दिवाणखान्यांत रिंग्सचे सरकवण्याचे पडदे असतात तसे अवजड पडजे थोडेच न्यायचे! त्या मोठमोठ्या बत्त्या, ते वांसे थेडेच बांधायचे आहेत? आणि कप्प्या लावून जोरानें खेंचण्याचें काम थोडेंच आहे? आपलें काम सुटसुटीत पाहिजे. झटपट सारें पाहिजे. साधें खादीचें कापड घेऊं व त्यावर निरनिराळे देखावे रंगवून घेऊं आणि त्या कड्या अडकवूं, पटकन् ओढायचें!” बन्सी म्हणाला.
“कोण देईल चित्रें काढून?”
“अरे आपल्या शाळेंत चित्रकार का थोडे आहेत? रामा आहे, मुकुंदा आहे, सोनार आहे. रंग व ब्रश हवेत.” नारायण म्हणाला.
“खर्च सारा मी देईन. खादी, रंग, कड्या, जो जो खर्च लागेल तो माझा.” जगन्नाथ म्हणाला.
“परंतु मुख्य गोष्ट राहिलीच.” गोविंदा म्हणाला.
“ती कोणती?”
“संवाद लिहून कोण देणार?”
“आपल्या शाळेंत ते नवीन पटवर्धन मास्तर आले आहेत ते देतील लिहून. कसें छान शिकवतात. आणि त्यांची दृष्टिहि उदार आहे. खरी राष्ट्रीय दृष्टि.”
“हो. आपण त्यांनाच विचारूं.”
आणि त्या शिक्षकांनी खरोखरच त्यांना निरनिराळे नाट्यप्रवेश लिहून दिले. कांहीं कांहीं नाट्यप्रवेश फारच सुंदर होते. मुलांना ते फार आवडले. शाळेची परीक्षा झाली. आतां दोनचार दिवसांत निकाल लागून मग उन्हाळ्याची सुटी सुरू होणार होती. मुलें ते नाट्यप्रवेश बसवूं लागलीं. पडदे रंगविण्याचेंहि काम सुरू झालें.
गुणाचें घर मोठें होतें. तो प्रचंड वाडा होता. जुना वाडा, वैभवहीन वाडा. त्या वाड्यांतच हे सारे प्रयोग सुरू झाले. जगन्नाथच्या घरीं त्याचा दादा होता तो कदाचित् या सर्व गोष्टींस विरोध करता. पडदे फेंकून देता. परंतु गुणाचे वडील तसे नव्हते. ते सहृदय होते. ते स्वत: संवाद पहायला हजर रहात. मुलांना सूचना देत. कांहीं कांहीं संवाद प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरचे होते. अधिकारी एका शेतक-याची गाय मारीत मारीत नेतात व त्या शेतक-यालाच पुन्हां तो अडथळा करतो म्हणून शिक्षा होते. या प्रसंगावर तो एक संवाद होता. तो फारच करुण होता. साक्षरतेवरचे संवादहि फार बहारदार होते.