“हे काय कावेरी?”
“तुमचे क्रांन्तीशी लग्न लावीत आहे?”
“माझे लग्न आधीच झाले आहे.”
“तुमचे लग्न झाले आहे?”
“हो.”
“खोटे सांगतां.”
“खोटे कसे सांगू? आमच्याकडे लहानपणीं लग्ने होतात.”
“ती धुळीत घाला लहानपणची लग्ने.”
“माझी इंदिरा वर्ध्याला महात्माजींच्या आश्रमांत आहे.”
“चरखा कांतीत असेल. आतां कसचें तुमचे लग्न क्रान्तीशीं लागते. तुमचे टकळीजवळ लग्न लागले, देवाची इच्छा! चला लौकर. तुम्ही हळू चालतां. घरी जायला उशीर होईल.”
वाटेत आता कोणी बोलले नाही. दोघे मुकी होती. मुकाट्याने घरी आली. काही दिवस गेले. एके दिवशी कावेरी जगन्नाथच्या खोलीत आली.
“मागे तुमची पत्रे येत असत. अलीकडे का बरे येत नाहीत?”
“मीच पाठवीत नाही. आणि मी येथून जाणार आहे. या पत्त्यावर पाठवूं नका पत्र असे कळविले होते.”
“खोटे खोटेच?”
“खरेट जाणार होतो. येथे राहणे नको असे वाटत होते.”
“का बरे?”
“कारण तू बोलत नव्हतीस, मौन धरले होतेस.”
“काय बोलायचे नेहमी?”
“क्रान्तीच्या गोष्टी.”
आम्ही कसली क्रान्ति करणार?”
“तुम्ही तर मला स्फूर्ति देतां.”