आणि संगीत सुरू झालें. गोविंदा तबलजी पुढें सरसावला. गुणानें हातांत सारंगी घेतली. वसंतानें पेटी सुरू केली. जगन्नाथ आलाप घेऊं लागला. सा-या सुरांचें व स्वरांचें मधुर संमेलन! मेळ जमला. मुलें डोलूं लागलीं. संगीत! संगीत म्हणजे दिव्यता आहे. कवीची कला संगीतापुढें तुच्छ आहे. काव्याचा अर्थ समजल्यावर त्याची मजा! परंतु संगीतांत अर्थहीन ध्वनिही परमार्थाची प्राप्ति करून देतात. हे ध्वनि आत्म्याला अनंताचें दर्शन करवितात. येथें अर्थाकडे लक्षहि नसतें. नादब्रह्मांत वृत्ति विलीन होतात. रणशिंगें, रणभेरी, नौबदी यांचें संगीत सुरू झालें तर घोडे फुरफुरूं लागतात. थै थै नाचतात; वीरांचे बाहु स्फुरण पावतात व घे घे मार करीत ते रणांगणांत गर्दीत घुसतात व जन्म-मरणाला विसरून जातात, मारण मरणांत रंगतात! संगीत! आणि तो मुरलीचा मंजुळ मधुर ध्वनि कानीं पडतांच डोळे मिटतात व भावनांचे अश्रु गालांवर येतात! आणि टाळमृदंगांचा भजननाद कानीं येतांच भीमातीरवासी विठोबाची मूर्ति डोळ्यांसमोर येते, पुंडलिकाचें वाळवंट आठवतें, शिर लवतें व वृत्ति विरून जाते, निरहंकार होते! सतार, सारंगी ऐका व हृदयाचे पडदे कसे खोलतात पाहा. तिकडे पडदा दाबला जातो आणि इकडे हृदयांतील एकेक पडदा वर जातो, उघडतो. गतकालांतील अनंत स्मृति, प्रेमप्रसंग, सारें सारें हृदयांत पुंजीभूत होऊन उभें राहतें. भूत, भविष्य, वर्तमान सा-यांचें त्या क्षणीं संमेलन असतें. स्मृतीच्या व आशांच्या तरंगावर जीव नाचत असतो!

जगन्नाथ तें एक गाणें आळवून म्हणत होता. गुणाची सारंगी हृदयाला पाझर फोडीत होती, हृदयाचीं आंतडीं जणुं खालींवर ओढीत होती. भावनामय गाणें. सहृदय गाणें. हरिजनांच्या सेवेचें गाणें. म्हण, जगन्नाथ म्हण. वाजव, गुणा वाजव. डोला, मुलांनो डोला!

निज बांधवां तुम्हि नांदवा।।धृ.।।

देवाच्याच मूर्ती
परि आज रडती
आतां त्यांना तुम्ही हांसवा।।निज.।।

करूं थोर हृदया
तम नेउं विलया
प्रेमैक्याला मनिं वाढवा।।निज.।।

हरिजन बंधू
जाऊन वंदू
संतप्त मना तुम्हि शांतवा।।निज.।।

गाणें वाजवणें बंद झालें आणि दुग्धप्राशनाचा रसाळ व मधुर कार्यक्रम सुरू झाला. दयाराम भारतींना दूध देण्यांत आलें. सारे मित्र दूध प्याले. हंसत-खेळत, आग्रह होत दूध पिण्याचा कार्यक्रम चालला.

“आतां यानंतर तर गाण्याला अधिक रंग चढेल.” एक मित्र म्हणाला.

“परंतु मी आतां जातों.” दयाराम भारती म्हणाले.

“आणि आपण जाऊं फिरायला. येतां सारे? माझ्या मळ्यांत जाऊं. चांदणें पहा कसें पडलें आहे. मग आल्यावर हें उरलेलें दूध पुन्हा पिऊं. येतां का रे?” जगन्नाथनें विचारलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel