“नाही.”
“मग मीहि जेवणार नाही.”
“छान होईल. आपल्या दोघांच्या उपवासाने तरी दादाचे मन जरा दयाळू होवो.”
माता गेली व रडत बसली. तीहि काही खाईना. घरांत चमत्कारिक वातावरण उत्पन्न झाले.
“आई, हे काय तुम्ही सर्वांनी आरंभिले आहे?”
“तूं गुणाच्या घरावर जप्ती नेऊ नको.”
“अशाने कसे होणार आई?”
“गुणा जगन्नाथचा मित्र आहे.”
“परंतु मित्र असेल तर जेवायला बोलाव म्हणावं. हे कुठले मित्रप्रेम जगाच्या विरहित?”
“तो जेवत नाही. तो जेवला नाही तर मी कशी जेवू?”
“अग पण कोण जप्ती नेत आहे?”
“जगन्नाथ म्हणतो की सारा गाव बोलतो आहे.”
“तसे काही होणार नाही.”
“मग तू जगन्नाथला तसे सांग.”
रात्री पंढरीशेट, जगन्नाथची आई, ते भाऊ, सारी बसली होती.
“जगन्नाथ, त्या घराचा लिलाव होऊं देणार नाही.”
“मग काय कराल?”
“खरेदीसारखे करून घेऊं. त्यांच्याकडेच ठेवू.”
“म्हणजे ते त्यांचे नाही ना राहणार? मी कितीदा सांगितले की हे कर्ज माझ्या वाट्याला द्या. ते बुडो, तगो, काही होवो.”